मुंबईहून सिंधुदुर्ग कडे जाणारे विमान अचानक रद्द, प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर विमान सोडले
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच मुंबईहून (दि. १४) चाकरमान्यांना चिपी विमानतळावर घेऊन येणाऱ्या विमानाची फेरी अचानक रद्द करण्यात आली. पायलट आणि क्रू मेंबर्सनी ड्युटी संपल्याने विमान उडविण्यास नकार दिल्याने ही फेरी अचानक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे मुंबई विमानतळावर चाकरमानी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर विमान कंपनीला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास 52 प्रवासी घेऊन विमानाची फेरी सोडणे भाग पडले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी चिपी विमानतळावर सेवा देणाऱ्या विमान कंपनीची अवस्था नाजुक असल्याचे सांगितले होते, त्यांचा प्रत्यय प्रवाशांना आला पण नाहक त्रासही सहन करावा लागला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिड वर्षांपूर्वी मोठ्या थाटात बहुचर्चित अशा चिपी विमानतळाचा लोकार्पण झाला. त्यावेळी राजकीय श्रेयवाद रंगत अनेकांनी आश्वासनाची विमाने हवेत उडविली. विमानाच्या लोकार्पण पासुन अलायन्स कंपनीने दिवसातून मुंबई ते चिपी अशी एक फेरी चिपी विमानतळावर सूरु केली. प्रवाशांनी या विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिला, मात्र पुढे चिपी विमानतळावर विकासकाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध न केल्यामुळे बदलत्या वातावरणाचा त्रास वैमानिकांना होऊ लागला, परिणामी अनेक वेळा विमान चिपीच्या रन-वे वर येवून माघारी गेले तर काही वेळा विमान फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली होती. अलिकडेच आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार या चारच दिवस विमानसेवा सुरू ठेवण्याचे कंपनीने निश्चित केले होते. त्यातही अनेक वेळा या नियोजित फेऱ्या रद्द झाल्या, त्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना चिपी विमान तळावरील सेवेचा फटका बसला.
www.konkantoday.com