
ट्रस्ट स्थापन करणार्यांनाच बेदखल केले ः कोकण दिंडी समाजाचा आरोप
रत्नागिरी ः पंढरपुरला दरवर्षी कोकणातून वारीसाठी जाणार्या कोकण दिंडी समाजाच्या माध्यमातून पंढरपूर येथे ट्रस्टच्या माध्यमातून उभ्या केलेल्या धर्मशाळेतून ज्यांनी हे सर्व उभे केले त्यांनाच आता बेदखल केले जात असल्याचा आरोप कोकण दिंडी समाजाच्या पदाधिकार्यांनी केला असून सध्याचे ट्रस्टचे पदाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विषयी माहिती देताना रूपेश महाराज राजेशिर्के यांनी सांगितले की, कोकणातून १८५१ पासून पंढरपुरला वारी जात होती त्यावेळी या दिंडीचे आद्यप्रवर्तक अन्याबा महाराज राजेशिर्के हे बेहेळगावचे होते. आज त्यांचे वंशज ही दिंडी चालवतात. निवास, भजन व किर्तनासाठी वारकर्यांनी वर्गणी काढून पंढरपूर येथे जागा घेतले व तेथे धर्मशाळा बांधली. १९६८ साली या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून ही मालमत्ता उभी करण्यात आली मात्र त्यानंतर २००० सालापासून ट्रस्टमध्ये मनमानी कारभार सुरू झाला.
विद्यमान विश्वस्तानी भाविक व वारकर्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला. आज स्ट्रस्टमध्ये ४५ खोल्या असून कोकणातील सुमारे २ हजार वारकरी जात असतात. परंतु आता त्यांनाच तेथे जागा उपलब्ध करून दिली जात नाही. तसेच गेल्या १२ वर्षात सभासद नोंदणी केलेली नाही. व जे सध्याचे विश्वस्त आहेत ते आपल्या मुलाबाळांचीच कार्यकारिणीवर वर्णी करीत आहेत. ज्यामुळे काही वर्षापूर्वी ज्यांनी हा ट्रस्ट व जागा उपलब्ध करून दिली त्यांनाच आता या ट्रस्टकडून बेदखल केल्याचा आरोप या वारकरी मंडळींनी केला आहे. चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शिवाजी चिले, सदाशिव घाग, रामकृष्ण कदम व अन्य कोकण दिंडी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com