
तर परशुराम घाटात वाहतूक तात्पुरती बंद ठेवणार…
चिपळूण : जास्त पावसाचा अंदाज वर्तविला गेल्यास परशुराम घाटात तात्पुरती वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. पूर्ण पावसाळ्यात येथे 2 जेसीबी व 6 टिप्पर सज्ज असतील व 2 पथके देखील 12-12 तास लक्ष ठेवतील. घाटाचे काम नव्याने झालेले आहे, त्यामुळे पावसात माती रस्त्यावर येण्याची शक्यता गृहीत धरून वेळीच रस्ता साफ करून वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार यांनी केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना देण्यात आली. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. आपत्कालीन परिस्थिती ती सक्षमपणे हाताळू, असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदींसह शासनाचे अधिकारी उपस्थित होते.