
खेडमध्ये नदीत गेलेल्या गुराख्यासह बैलावर मगरीचा हल्ला
खेड : तालुक्यातील नारंगी नदीपात्रात बैलाला पाणी पिण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला चढवत जखमी केले. तसेच बैलावरही झडप घालून जखमी केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. चिंचघर प्रभुवाडी येथे राहणारा तरुण जीवन कडू (वय 26) हा आपल्या बैलाला घेऊन नारंगी नदीपात्रात गेला होता. बैल पाणी पीत असतानाच अचानक मगरीने कडूवर हल्ला केला. मगरीने कडू यांच्या हाताला चावा घेतला. त्याने मगरीच्या तोंडातून हात कसाबसा सोडवला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याचवेळी मगरीने पाणी पीत असलेल्या बैलावरही झडप घातली. बैलानेही आपली सुटका करून घेतली. मात्र तोही त्यामध्ये जखमी झाला आहे. जखमी जीवन कडू याला उपचारासाठी दापोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.