
खेड बसस्थानकातील उपाहारगृह अद्यापही कुलूपबंद, प्रवाशांचे हाल.
खेड बसस्थानकातील उपाहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याने उपाहारगृहाला कुलूप लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंदावस्थेतील उपाहारगृहामुळे एसटी बसच्या वाहनचालकांसह प्रवाशांची हेळसांड सुरू आहे. उपाहारगृह नेमके कधी खुले होईल, याची हमी दस्तुरखुद्द एसटी प्रशासनही देवू शकत नसल्याने प्रवाशांना उपाहारगृह खुले होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून उपाहारगृहाला टाळे ठोकण्यात आले आहे. उपाहारगृहाअभावी लांबपल्ल्याच्या ठिकाणाहून पहाटेच्या सुमारास येथील स्थानकात येणार्या प्रवाशांची परवड सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी ही बिरूदावली मिरवणार्या एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे. उपाहारगृह बंद असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवात उपाहारगृहाच्या बाहेर तात्पुरत्या स्वरूपात बचतगटाला चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्याची मुभा देण्यात आली होती. यामुळे काहीअंशी गणेशभक्तांची सोय झाली होती. www.konkantoday.com