बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज करणे गरजेचे-माजी खासदार आनंदराव अडसूळ
बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज करणे गरजेचे आहे तसेच बँकेची प्रगतशील वाटचाल कशी होईल यावर लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले. ते युनियनच्या रत्नागिरीतील वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
ही सभा रविवारी (ता. १०) दुपारी १२.३० वा. जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी कार्याध्यक्ष सुनील साळवी, सल्लागार नरेंद्र सावंत, जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, दरेकर, पार्टे, काळे, चोगले, अमोल साळवी, नरेश कदम, दिलीप लाड, कुणाल दाभोळकर व युनियनचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, एसटी को -ऑपरेटिव्ह बँक, कोकण मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, पीएमसी बँक व अपना बँकेतील संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. युनियनच्या सभेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक चव्हाण यांना बँकेच्या कार्यकारी संचालकपदी काम करण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ मिळाल्याबद्दल अडसूळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सभेमध्ये युनियनचे १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील जमाखर्च पत्रकास सभासदांकडून मान्यता देण्यात आली. या सभेमध्ये युनियनचे सल्लागार नरेंद्र सावंत यांनी बँकेच्या कर्मचारीवर्गाला एकच युनिफॉर्मबाबत मत व्यक्त केले तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना तत्पर सेवा देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर या सभेमध्ये युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी दापोली अर्बन बँक व राजापूर अर्बन बँकेमध्ये कराराची मुदत संपली असल्याने नवीन मागणीपत्र देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले. त्याचप्रमाणे दापोली अर्बन बँकेमध्ये बँक संचालक कर्मचारी प्रतिनिधी यांना बैठक भत्ता देत नसल्याने कोर्टामार्फत उचित कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. या सभेचे सूत्रसंचालन रवींद्र रजपूत यांनी तर सान्वी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
www.konkantoday.com