
आबलोली खालील पागडेवाडी येथे वाघ बारस उत्साहात साजरी
गुहागर तालुक्यातील आबलोलीतील आबलोली खालील पागडेवाडी येथे आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने वाघ बारस उत्साहात साजरी करण्यात आली.
आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने गेली कित्येक वर्ष वाघ बारस ही परंपरा म्हणजे पाळली जात आहे. वाघ गावाच्या बाहेर पिटाळणे म्हणजे वाघ बारस. वाघबारस पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची पद्धत आजही अखंडितपणे येथे सुरू आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात जसा वसुबारस साजरा केला जातो. तसेच काही भागात वाघबारस साजरा देखील केला जातो. वाघबारस सण हा तसा आदिवासी बांधवांमध्ये साजरा केला जातो. मात्र कालांतराने तो ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी साजरा केला जाऊ लागला. जंगलात आपल्या जनावरांसह राहणाऱ्या माणसांवर जंगलातील वाघाने हल्ला करू नये उलट त्याने सर्वांचे संरक्षण करावे यासाठी जंगलातील वाघाची प्रतीकात्मक पद्धतीने पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळी सणाची सांगता होत असताना वाघबारस हा सण साजरा केला जातो.
यावेळी गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र जमत वाघाचा वेष धारण करतात, त्याची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवून त्याला जंगलात पाठवतात. जंगलात वावरताना कोणत्याही स्वरूपात हल्ला न करण्याची प्रार्थना करत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा कोकणातील काही भागात आजही सुरू आहे.



