मित्रानेच केली मित्राची तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक


मित्रावर विश्वास ठेवून केलेल्या व्यवहारात फसवणूक झाल्याने त्याचा फटका एका मित्राला बसला आहे
मित्रावर विश्वास ठेवून स्वतःचा लाखो रुपयांचा डंपर करारपत्रावर दिला. परंतु मित्राने विश्वासघात केला. उत्पन्नापैकी एक ही रुपया दिला नाही. उलट हप्ते चुकवून तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.
याप्रकरणी धोडींबा नवनाथ पुजारी (२७) रा.मोहोळ सोलापूर याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूण शहरातील पाग येथील अमर चंद्रकांत लटके हे जिम ट्रेनर असून त्यांच्याकडे एक डंपर वाहन देखील होते. तो डंपर त्यांनी आपल्या ओळखीचा मित्र धोंडिबा नवनाथ पुजारी याला करारपत्र करून सप्टेंबर २०१९ साली चालवण्यासाठी दिला. त्यानुसार गाडीचे हप्ते भरणे, तसेच भाड्यापोटी काही रक्कम मालकाला द्यावी असे देखील ठरले होते. एक मित्र म्हणून फिर्यादी यांनी धोंडिबा पुजारी याच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपयांचा डंपर त्याच्या ताब्यात दिला होता.
परंतु वर्ष दोन वर्षे उलटली तरी पुजारी याने फिर्यादिना उत्पन्नापैकी काहीच दिले नाही. उलट डंपरवर असलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकवले. फिर्यादिनी वारंवार विचारणा करून देखील पुजारी दाद देत नव्हता. तसेच डंपर परत देण्यासाठी देखील टाळाटाळ करत राहिला. आपले नुकसान होऊन फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच अमर चंद्रकांत लटके यांनी चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी धोंडिबा पुजारी याच्यावर विश्वासघात करून फसवणूक केली आणि ८ लाख २८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button