ज्येष्ठ इतिहास संशोधक अनंत तथा अण्णा शिरगावकर यांचे हृदयविकाराने निधन

चिपळूण : ज्येष्ठ इतिहास संशोधक अनंत तथा अण्णा शिरगावकर यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी देहदान केले असल्याने त्यांच्यावर कोणतेही अंत्यसंस्कार झाले नाहीत. बुधवारी दिवसभर त्यांचा मृतदेह डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. कोकणात ‘अपरान्त’ शब्द रूढ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी दुर्मीळ वस्तुंचा संग्रह केला. आजवर त्यांनी 14 पुस्तकांचे लेखन केले आहे. गुहागर तालुक्यातील विसापूर हे त्यांचे मूळ गाव होय. अण्णा यांनी शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध आदी विषयांमध्ये मोलाचे कार्य केले. सागरपुत्र विद्या विकास संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा केली. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, मूर्ती, सनदा, नक्षीदार भांडी आदी वस्तुंचा संग्रह त्यांनी केला. गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मालघर येथे राहात होते. वयोमानानुसार थकल्यानंतरही शिवकाळ व पेशवाई या दोन विषयांवर स्वतंत्र पुस्तक सत्यात उतरण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात सुन, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button