चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक , सेवा सुरू होण्यास अडचणी


चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे.चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्‍याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.
दरम्‍यान, इतर कंपन्यामार्फत वेगवेगळे रूट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या रूटवर खाजगी पध्दतीने विमान घेतले तर साधारण 13 हजार रूपये एक प्रवाशी भाडे बसेल तर ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही. या उलट मोपा येथे तिकीट दर सर्व सामान्यांना परवडणारा आहे. त्यामुळे खाजगी पध्दतीचा विचार करणे योग्य ठरत नाही. छोट्या विमानांच्या माध्यमातून जिल्ह्यात काही करता येईल का? याबाबतचा विचार सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button