
आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे थांबवा; अन्यथा आम्ही उत्तर देऊ-खासदार सुनील तटकरे
राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत. त्यामुळे अजितदादांनी कोणती चूक केली? आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे सांगून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे थांबवा; अन्यथा आम्ही उत्तर देऊ,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
पक्षाचा जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान आणि शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तटकरे बोलत होते. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, संभाजी होळकर, रणजित शिवतारे, वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.
“पुणे शहरात सुमार दर्जाच्या काही लोकांना अजितदादांनी मोठे केले आहे. ते लोक दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. सन 2014 मध्ये भाजपने न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. मग अजित पवार यांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा कसा? असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com




