राधाकृष्ण विखे पाटलांवर कृती समिती सदस्यानं भंडारा टाकला;भंडारा टाकणाऱ्याला सुरक्षारक्षक व कार्यकर्त्यांनी दिला चोप
राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षण व त्यातून मागणी केलं जाणारं मराठा आरक्षण हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यापाठोपाठ दुसरीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार समोर आला असून यावरून आता धनगर आरक्षणाचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे
राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना सकाळी त्यांना भेटण्यासाठी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याची माहिती त्यांना कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं.
यावेळी बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीचा पदाधिकारी एक निवेदन घेऊन तिथे दाखल झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने निवेदनही दिलं. मात्र, विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्यानं खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.
झाला प्रकार सर्वांसाठीच अनपेक्षित असल्यामुळे काय घडलंय हे समजण्यासाठी मध्ये दोन क्षण गेले आणि विखे पाटलांच्या अंगरक्षकांनी बंगाळेची लगेच धरपकड करून त्याला चोप दिला. त्यात विखे पाटलांचे काही कार्यकर्तेही असल्याचं सांगितलं जातं. यानंतर पोलिसांनी बंगाळेला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
www.konkantoday.com