
मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी कोट्यातून नको -कुणबी सेनेची मागणी
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत कुणबी व ओबीसी समाजाचा कोणताही आक्षेप नाही परंतु मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसीच्या कोट्यातून वाटेकरी करणे हा ओबीसींमधील गरीब लोकांवर अन्याय ठरेल, ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे मराठा आरक्षण वेगळ्या कोट्यातून द्यावे, त्यासाठी ओबीसी समाजावर अन्याय करू नये, अशी मागणी येथील कुणबी सेनेने जिल्हाधिकार्यांसाठीचे निवेदन तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे सुपूर्द केले.
निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील मराठा समाजावर लाठीचार्ज झाला. ही दुर्दैवी घटना आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत कुणबी व ओबीसींचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणे हे चुकीचे आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रातील प्रगत समाज असून आतापर्यंत सुमारे ९५ टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होवून गेले आहेत. लोकनेते स्व. शामराव पेजे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने कोकण कुणबी विकास समितीची २४ नोव्हेंबर १९८१ रोजी स्थापना केली. या समितीने शासनाला सादर केलेल्या पेजे समिती अहवालातील शिफारशींच्या पूर्ततेसाठी कुणबी सेनेने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी कुणबी साजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलने व लढे उभारले आहेत. शासनाने या मागणीची दखल घ्यावी. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास कुणबी सेना, कुणबी समाज व ओबीसी समाज तीव्र आंदोलने करतील याची दखल घ्यावी असा इशाराही देण्यात आला. यावेळी कुणबी सेनेचे जिल्हा चिटणीस प्र्रदीप उदेग, गजानन वाघे, उत्तर जिल्हाप्रमुख दिनानाथ रावणंग, राजेंद्र पवार, शशिकांत वाघे, बबन शिगवण, अमोल रावणंग, शहरप्रमुख अमोल निर्मळ, विनायक पिटले, सुभाष आग्रे, गणेश फके, दिपक निवाते, महेश नावरे, मंदार देवाळे, मामा जोशी, पांडुरंग उंडरे, हरिश्चंद्र फुटक, लिना फुटक, संदीप बांद्रे उपस्थित होते.
www.konkantoday.com