गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोलकी तसेच डेकोरेशन साहित्य विक्री करणारे आणि घरोघरी जाऊन तृतीयपंथीच्या वेषात पैसे मागणाऱ्या व्यक्तींची योग्य ती तपासणी आणि चौकशी करा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोलकी तसेच डेकोरेशन साहित्य विक्री करणारे आणि घरोघरी जाऊन तृतीयपंथीच्या वेषात पैसे मागणाऱ्या व्यक्तींची योग्य ती तपासणी आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन लांजा पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले.लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या कोकणात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या गणेशोत्सवानिमित्त परप्रांतीय ढोलकी विक्रेते तसेच डेकोरेशनचे साहित्य विक्रीसाठी गावागावात लोक दाखल झाले आहेत. त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लांजा तालुक्यात गावागावांमध्ये काही तृतीयपंथीय लोकांच्या वेषात काहीजण घरोघरी जाऊन जबरदस्तीने लोकांकडून पैसे मागत फिरत आहेत. गावातील काही घरांमध्ये महिला व वृद्ध माणसे एकटीच राहतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अशा परप्रांतीय व्यक्तींची योग्य ती तपासणी आणि चौकशी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदन सादर करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मनोज देवरुखकर, तसेच शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर ,तालुका सचिव विनायक धूमक, उप तालुका अध्यक्ष राकेश राऊत, उपशहर अध्यक्ष अनिल गुरव आणि मनसे सैनिक उपस्थित होते
www.konkantoday.com