
चिपळूण शहरात महिलेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासूवर गुन्हा
चिपळूण शहरातील एका महिलेचा शारिरीक व मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती व सासू या दोघांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरंजन दुर्गे व त्याची आई (सासू), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी २०२४ मध्ये ती चिपळूण ते पुणे एसटीमधून प्रवास करत असताना निरंजन दुर्गे यांच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर त्यांची ओळख वाढत गेली. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने नाशिक व चिपळूण येथे तिच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यातून ती आठ महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर निरंजन याने अलिकडेच तिच्या इच्छेविरोधात विवाह केला. मात्र तिच्याशी विवाह केल्यानंतर त्याचे बाहेरही एका मुलीशी संबंध असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्याला विचारणा केली असता तो मारझोड करतो, शिवीगाळ करून धमकावतो, तसेच सासू देखील त्रास देत असल्याची तक्रार संबंधित पीडित महिलेने चिपळूण पोलीस स्थानकात दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून निरंजन दुर्गे व त्याच्या आईवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ६४ (२) एम), ११५(२), ३५१(१), ३५१(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी करीत आहेत.
www.konkantoday.com




