त्या तीन भोंदू बाबांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला
खेड तालुक्यातील भरणे – गणेशनगर येथील एका कष्टकरी महिलेस गुप्तधनाचे आमिष दाखवत जादूटोण्याचा प्रकार करत तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या ‘त्या’ तथाकथित ३ भोंदूबाबांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पुन्हा ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खेड भरणा नाका येथे वास्तव्यास असलेल्या विठाबाई अण्णाप्पा पवार या महिलेस प्रसाद हरीभाऊ जाधव, विवेक यशवंत कदम, ओंकार विकास कदम या तीन भोंदूबाबांनी ‘अमच्याकडे दैवी शक्ती असून तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून कोट्यवधी रूपये मिळवून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांना गंडा घातला होता. फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर येथील पोलिसांनी अवघ्या तीन तासांतच येथील पोलिसांनी तीनहीभोंदूबाबांना पाटण-हिरेवाडी येथून जेरबंद केले होते. प्रसाद जाधव या मुख्य सूत्रधाराने फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची व्हॅगनार कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान, सरकारी पक्षातर्फे अॅड. स्मिता कदम यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पोलीस उपनिरीक्षक हर्षल हिंगे साऱ्या शक्यतांचा पडताळा करत असून तपास कामाला आणखी गती दिली आहे.
www.konkantoday.com