आमचा रिपब्लिकन पक्ष हा महायुती आणि देशपातळीवर एनडीएसोबत असेल-रामदास आठवले
आमचा रिपब्लिकन पक्ष हा महायुती आणि देशपातळीवर एनडीएसोबत असेल. महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दहा जागा भाजपाकडे मागणार आहोत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यावतीने कोकण प्रदेश रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा बाळासाहेब माटे सभागृहामध्ये झाला. त्यासाठी चिपळूण दौऱ्यावर आलेले मंत्री आठवले म्हणाले, ‘राज्यातील महायुतीचे सरकार हे अभेद्य असून, या सरकारनेही अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचा उपयोग जनतेला होत आहे.
मी घेतलेल्या शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याच्या निर्णयामुळे गावागावात सामाजिक सलोखा निर्माण होत आहे. त्याचा एक चांगला परिणाम समाजामध्ये दिसून येत आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही एका मंत्रीपदाची मागणी केली होती; मात्र भाजपने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे आमची नाराजी आहेच; पण यापुढे जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आठवले यांनी सांगितले.
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार अनेक लोकहिताचे निर्णय घेत आहे. आमचे सरकार हे भारतीय लोकशाही व संविधानाला मानणारे सरकार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला सर्वोच्च स्थानी मानणारे आहेत, असे असताना राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी कितीही मागणी केली व तसा प्रयत्न केला तरी आम्ही तो सहन करणार नाही, तसे होऊ देणार नाही.
www.konkantoday.com