शिक्षक भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगारांनाच संधी द्यावी;-राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत


शिक्षक भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगारांनाच संधी द्यावी; अन्यथा परजिल्ह्यातील उमेदवारांना जिल्ह्यातील शाळेत रुजू होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकातून दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात वसला असून, येथील शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण चांगले आहे. ‘दहावी, बारावीमध्ये कोकण अव्वल’, अशा बातम्या बऱ्याच वर्तमानपत्रांत झळकतात; पण हीच कोकणची मुले नोकऱ्यांत कुठे जातात? त्यांच्याकडे गुणवत्ता नाही का? की त्यांना कोकणला भरतीत डावलले जाते? सिंधुदुर्ग नोकरीचा कारखाना बनला आहे का? जिल्ह्यात रोजगाराची संधी, उद्योग, व्यवसाय अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. गेली दहा वर्षे भरती झाली नसल्याने हजारो उच्चशिक्षित डी.एड. धारक बेरोजगार म्हणून पडून आहेत. या भरतीत त्यांना संधी न मिळाल्यास त्यांचे आयुष्य देशोधडीला लागणार आहे. सद्यस्थितीत पोर्टल सुरू होऊन टीईटी परीक्षा पास असणारे राज्यातील सर्वच उमेदवार रजिस्ट्रेशन करणार आहेत. भरती बरीच वर्षे न झाल्याने लोंढा मोठा आहे. भरती राज्यस्तरीय असल्याने स्पर्धाही वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या ‘टेट’ (TAIT) परीक्षेच्या मेरीटवरच पोर्टलच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीत साहजीकच स्थानिकांना न्याय मिळणार नाही, असे चित्र आहे. दरम्यान, निवृत्त शिक्षकांना घेण्याचा शासन निर्णय आला; पण ५० च्या घरातच निवृत्त शिक्षक रुजू झाल्याने हा पर्याय फोल ठरला. भरती प्रक्रियेतून स्थानिक डी.एड. धारकांना नियुक्त्या मिळाल्यास वारंवार होणारी आंदोलने आणि स्थानिक भूमिपुत्रांवर होणारा अन्याय थांबेलशिक्षणमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असून, त्यांनी स्थानिकांना न्याय देणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. ते दिवसागणिक नवीन घोषणा करत आहेत. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील स्थानिकांना न्याय देण्याचे काम करावे, असा टोला सामंत यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button