माझा गणेशोत्सव माझा मताधिकारगणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे— राहूल गायकवाड


*रत्नागिरी दि.4:- दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरुन जाते. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करुन त्यातून मतदार जागृतीबाबत सामाजिक संदेश देता येतात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. तरी जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन मतदार जागृतीबाबतच्या सामाजिक संदेशाचा देखावा सजावटीतून सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले आहे.
या स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीद्वारे मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण इ. विषयावर प्रबोधन करावयाचे आहे. देखावे सजावटीसाठी काही ढोबळ विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1. लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही! 2. मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून.. 3. आम्ही मतदान करणार, कारण.. 4. हक्क वंचितांचे, मार्ग मताधिकाराचा 5.शहरी मतदारांची अनास्था कारणे आणि उपाय. या विषयांपलीकडेही जाऊन आपणास देखाव्यांतून सामाजिक संदेश देता येतील. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे आवश्यक आहे.

पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नाव नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

प्रत्येक नागरिकाला विविध प्रकारच्या सार्वजनिक सुविधा प्राप्त होणे आणि त्या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे, आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू व तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरुपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच खऱ्या अर्थाने लोकांनी, लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

स्पर्धेचा गूगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली लवकरच पाठविण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे – प्रथम क्रमांक एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक – एकावन्न हजार रुपये, तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये आणि उत्तेजनार्थ दहा हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे (वि.सू. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसाच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील.)
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button