
कोमसाप मालवण शाखेचा “बीज अंकुरे अंकुरे”चा उपक्रम अभिनव : मधु मंगेश कर्णिक________
मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने प्रसिद्ध केलेल्या “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकासारखा अभिनव उपक्रम केवळ कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये अन्य कोणी केला नसेल”, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक – पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले.
“बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणाच्या दादासाहेब शिखरे सभागृहात झाला. त्यावेळी आभासी पद्धतीने उपस्थित असलेले श्री. कर्णिक पुस्तकाच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था कोकणातील उदयोन्मुख आणि प्रतिथयश साहित्यिकांसाठी स्थापन झाली. लिहित्या हातांनी केलेली साहित्यनिर्मिती वाचक रसिकांसाठी प्रकाशात आणावी आणि आधीच साहित्यसंपन्न असलेल्या कोकणातील नव्या साहित्यउन्मेषांमुळे या भूमीची सांस्कृतिक संपन्नता वर्धिष्णु व्हावी, हा परिषदेचा मूळ हेतू आहे. कोमसापच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाच्या प्रकाशनातून तो साध्य केला आहे. हा अक्षर उपक्रम कौतुकास पात्र आहे.
कोकणचे सुपुत्र ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या पुण्यतिथीदिवशी पुस्तक प्रकाशन पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोमसापचे केंद्रीय सदस्य मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनायक करंदीकर (कणकवली), रामचंद्र आंगणे (स्वीय सहाय्यक, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), रवींद्र वराडकर (ज्येष्ठ साहित्यिक), लक्ष्मीकांत खोबरेकर (कार्यवाह, नाथ पै सेवांगण), अशोक कांबळी (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), अनिकेत कोनकर (प्रकाशक सत्त्वश्री प्रकाशन) आणि सुरेश शामराव ठाकूर (संपादक, बीज अंकुरे अंकुरे) उपस्थित होते.
सुरेश ठाकूर यांनी पुस्तक निर्मितीची कुळकथा सांगितली. कोमसाप मालवणच्या “पेरते व्हा” या नव्या लिहित्या हातांची ही अक्षर निर्मिती आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना श्री. पिंटो म्हणाले, पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोमसापच्या ६७ शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये ४० लिहित्या हातांना एकत्र करून दोन पुस्तके प्रकाशित करण्याची किमया मालवण शाखेने साध्य केली. ही गोष्ट निश्चितच लक्षवेधक आहे. त्या लिहित्या हातांकडून ४० नवीन पुस्तके नक्कीच प्रकाशित होतील.” कोमसापच्या कवींचाही एक काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, त्यात मलाही संधी मिळावी आणि हे पुस्तक आपण केशवसुतांच्या चरणी अर्पण करावे, अशी इच्छा त्यांनी प्रकट केली.
निमंत्रित वक्ते डॉ. विनायक करंदीकर यांनी वि. स. खांडेकर यांचे जीवनचरित्र आणि कोमसापची वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना श्री. आंगणे म्हणाले, सोळा लेखकांची भाषाशैली, विषय आणि लेखन विविधांगी असल्याने चपखल अशा पद्धतीत लेखन झाले आहे. संपादक सुरेश ठाकूर यांनी आपल्यासोबत आपल्या सदस्यांनाही पुस्तकनिर्मितीची जी संधी उपलब्ध करून दिली, ती खरेच मार्गदर्शक आहे.
श्री. खोबरेकर आणि श्री. वराडकर यांनी कोमसाप-मालवणच्या सर्व लेखकांचे कौतुक केले. पत्रकार अनिकेत कोनकर यांनी लेखनातील तांत्रिक कौशल्यांबाबत उपस्थित सदस्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले.
यावेळी पुस्तकातील लेखकांनी ‘बीज अंकुरे अंकुरे ने’ आपणास काय दिले यावर आपले विचार मांडले. पुस्तकाच्या ई – आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी श्री. वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ रश्मी आंगणे यांच्या शारदास्तवनाने करण्यात आला. ऋतुजा केळकर यांनी स्वागत केले, तर आभार दिव्या दीपक परब यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.
www.konkantoday.com