पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करास्वच्छ, सुंदर, हरित रत्नागिरी सायकल रॕलीमार्फत जिल्हा प्रशासनाची जनजागृती
*रत्नागिरी, दि. ३ (जिमाका) : ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, स्वच्छ, सुंदर व हरित रत्नागिरी’ हा संदेश घेवून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आज सायकल रॅली काढून जनजागृती केली.
पोलीस परेड ग्राऊंड येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सायकल रॅलीचा शुभांरभ केला.
यावेळी परिविक्षाधिन आयएस अधिकारी डाॕ. जस्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांबळे, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब चे दर्शन जाधव, महेश सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, गणेशोत्सवासाठी जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हरित रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी हे तीन उद्देश घेऊन आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा. याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी 30 कि.मी. ची सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले अहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उद्देशासोबतच अधिकारी, कर्मचारी यांनी आपले आरोग्य, स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा संदेशही या सायकल रॅलीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले कोकणामध्ये गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. अधिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल चालविणे हा पर्यावरणपूरक असा उपक्रम असल्याने सायकल रॅलीच्या माध्यमातून जनतेला या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संदेश देऊ या.
पोलीस परेड ग्राऊंड येथून या रॅलीला प्रारंभ होऊन मारुती मंदिर-गोडावून स्टॉप-आरटीओ ऑफीस-कुवारबाव-रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन मार्गे परत कुवारबाव-मारुती मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन-आठवडा बाजारमार्गे येवून पोलीस परेड ग्राऊंड येथे या रॅलीची सांगता झाली.
पर्यावरणपूरक मातीच्या, कागदी मूर्त्यांचा वापर, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर, सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता कागद, कापडी पडद्यांचा वापर तसेच डॉल्बी टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर याबाबत या रॅलीमधून संदेश देण्यात आला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, हा संदेश देण्यासाठी पोलीस परेड ग्राऊंड येथे सेल्फी पाईंटही उभारण्यात आला होता. तसेच
याठिकाणी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्धार मतदानाचा – मी मतदान करणारच.. !’ यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
या सायकल रॅलीमध्ये अधिकारी, कर्मचारी, सायक्लीस्ट, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
www.konkantoday.com