
जिल्हा परिषदेच्या निवृत्ती धारकांची पेन्शन प्रथमच एक सप्टेंबरला बँकेत जमा
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रथमच एक सप्टेंबरला बँकेत जमा झाल्याने सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेत पेन्शन मिळावी ही मागणी सर्वप्रथम श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे करण्यात आली आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर पेन्शन दर महिन्याच्या ५ किंवा ६ तारखेला बँकेत जमा होऊ लागली. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा च्या मागणीमुळे संपूर्ण राज्यातील पेन्शन धारकांचा प्रश्न ऐरणीवर आला. शासनाने आता १ सप्टेंबर पासून पेन्शन चा हा रत्नागिरी पॅटर्न राज्यभरात लागू करून निवृत्त कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या महिन्यात खुश केले आहे.
जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी आणि शिक्षक निवृत्ती वेतन दरमहा पंधरा ते पंचवीस तारखेच्या दरम्यान बँकेत जमा होत असे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाने शासन दरबारी या प्रश्नावर आवाज उठविला होता. याची दखल राज्यस्तरावर घेण्यात येऊन मागील विधानसभेच्या अधिवेशनात जिल्हा परिषद सेवा निवृत्तांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.
अखेर या आश्वासनाची पूर्तता होऊन जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतन वेळेवर अदा करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांना प्रथमच काल एक सप्टेंबर रोजी, त्यांचे निवृत्ती वेतन बँकेत जमा करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या कामी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. त्याबद्दल श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com