येत्या १५-२० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे होणार उद्घाटन-पालकमंत्री उदय सामंत
*रत्नागिरी, दि. २ : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज उद्यमनगर येथील शासकीय स्त्री रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली व आढावा घेतला. शासकीय महाविद्यालयाचे येत्या १५ ते २० दिवसात उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केद्रीय मंत्री नितीन गडकरी आदिंची उपस्थिती असेल, अशी माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली व आढावा घेतला. शासकीय महाविद्यालय हे रत्नागिरीकरांचे स्वप्न होतं आणि ते शिंदे- फडणवीस सरकारमुळे पूर्ण झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन होईल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरु असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतही त्यांनी आढावा घेतला. आतापर्यंत ८८ प्रवेश झाले असून, त्यामध्ये महाराष्ट्रामधील ८२ तर परराज्यातील ६ आहेत. महाविद्यालयातील १०० ॲडमिशन पूर्ण होतील, असे ते म्हणाले.
याआधी पालकमंत्री श्री. सामंत यांनी रत्नदूर्ग (भगवती) किल्ला येथे भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला. शिवसृष्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. संसारे गार्डन येथे उभारण्यात येणाऱ्या ध्यान केंद्राच्या ठिकाणाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. आढावा घेतला आणि ध्यान केंद्राबाबत प्लान तात्काळ करुन लवकरात लवकर निविदा प्रक्रीया पूर्ण करा, अशा सूचना केल्या. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही पालकमंत्री श्री. सामंत यांनी पाहणी केली व आढावा घेतला. येथे सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com