
अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती-मंत्री आदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. आज जिल्ह्यातील घोटी, तालुका इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यापीठावर राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, ० ते ६ वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे असून सुपोषीत भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये मांडली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्ण श्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सेविका व मदतनीस व जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
www.konkantoday.com