
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार, शासन निर्णयाबाबत शुद्धीपत्रक
*रत्नागिरी दि. १ : सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून याबाबतचा ४ जुलै रोजीच्या शासन निर्णयाबाबतचे शुध्दीपत्रक ३० ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे. त्यानुसार निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळांकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील च्या ऐवजी निवड समिती १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील असा बदल करण्यात आल्याबाबचे शुध्दीपत्रकात म्हटले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, पु. ल. देशपांडेमहाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल.
जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन जिल्हयातून एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येऊन २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास ५ लाख, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून २०२३०७०४१६३११८२१२३ असा त्याचा संकेतांक क्रमांक आहे.
www.konkantoday.com