
आस्तान कातकरी वाडी येथील आत्महत्या प्रेमप्रकरणातून; भारतीच्या घरी सापडलेल्या प्रेमपत्रांमुळे आत्महत्येचे कारण झाले स्पष्ट
खेड : तालुक्यातील आस्तान कातकरी वाडी येथील मुलींनी केलेल्या आत्महत्या या प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. भारती हिलम हिच्या घरातून मिळालेल्या प्रेमपत्रामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेली १२ वर्षीय साक्षी ही भारतीशी असलेल्या घट्ट मैत्रीची बळी ठरली आहे.
पोलीस आणि विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९ वीच्या इयत्तेत शिकणारी भारती हिचे तीच्याच घराशेजारी राहणाऱ्या रुपेश याच्यावर जीवापाड प्रेम होते. गेली काही वर्षे ही दोघे लग्नाच्या आणाभाका घेत होते. रुपेश याच्याशी लग्न करून आपला संसार फुलवायचा असे स्वप्न भारती पहात होती. रुपेश यांने देखील तिला लग्नाचे वचन दिले होते. मात्र दोघांच्या घरच्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती.
१० पर्यंत शिक्षण घेऊन मोलमजुरीस लागलेल्या रुपेश याच्यासाठी घरच्यांनी मुलगी बघण्यास सुरवात केली होती. रुपेश याच्यावर प्रेम करणाऱ्या भारतीला हे जेव्हा कळले तेव्हापासून ती तणावाखाली वावरत होती. रुपेश याने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले तर मी त्याची बायको पाहण्यासाठी या जगात नसेन असे तीने आपली जीवलग मैत्रीण आणि रुपेश याची चुलत बहीण साक्षी हिला सांगितले होते. दरम्यान रुपेशच्या घरच्यांनी मांडवे कातकरी वाडी येथील एका मुलीशी रुपेशचे लग्न नक्की केले. हे भारती हिला कळताच ती ते सहनच करू शकली नाही आणि तीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
रुपेशचे लग्न ठरल्यामुळे आपली जीवलग मैत्रीण भारती आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही याची १२ वर्षीय साक्षीला खात्री होती. त्यामुळे ती तीला एकटी सोडायला तयार नव्हती.प्रियकराचे लग्न दुसऱ्या मुलीबरोबर होणार आहे ही कल्पनाच सहन न झाल्याने भारती ही जीवन संपवण्यासाठी संधी शोधत होती. आणि ती संधी तिला बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मिळाली. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून तीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र साक्षी तिला जरादेखील नजरेआड करायला तयार नव्हती.
सकाळी बाहेर गेलेली भारती १० वाजण्याच्या सुमारास घरी परत आली. साक्षी तेव्हाही तीच्याच सोबत होती. घराच्या पडवीत बसलेल्या वृद्ध आजोबांना ‘मी कपडे बदलायला आत जात आहे असे सांगून ती घरामध्ये गेली. साक्षी देखील तीच्यासोबत आतमध्ये गेली. बंद दाराआड भारती हिने कोणतेतरी विषारी द्रव्य घेताच तीची जीवलग मैत्रीण साक्षी हिने देखील तेच द्रव्य प्राशन केले. काही क्षणातच या दोघींही दरवाजा उघडून बाहेर आल्या आणि आजोबांसमोरच जमीनीवर कोसळल्या. अखेर भारतीचे प्रेम हरले आणि नियती जिंकली.
www.konkantoday.com