वेदमूर्ती पंडित श्रीपाद सातवळेकर यांचे कार्य स्फूर्तीदायक- अंजली बर्वे


रत्नागिरी : सावंतवाडी तालुक्यातील कोलगावातील वेदमूर्ती पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी आयुष्यभर वेदांचा आणि संस्कृतचा प्रचार- प्रसार करण्यासाठी त्याचे महत्त्व जनमानसात महत्प्रयासाने रुजावे, यासाठी कार्य केले. अशा वेदमूर्ती सातवळेकर यांचे कार्य स्फूर्तीदायक आहे असे गौरवोद्गार प्रवचनकार अंजली बर्वे यांनी काढले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राष्ट्रभावना रुजवण्यासाठी वेदमूर्ती सातवळेकर यांनी ८३ सूक्तांवर आधारित वैदिक राष्ट्रगीतांचे पुस्तक लिहिले. हरिद्वार येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वैदिक प्रार्थनांची तेजस्विता हा लेख लिहिला. वेद, उपनिषदे, भगवद्गीता यावरील भाष्य, वेदातील सर्पविज्ञान, कृषिविज्ञान यासारखे अनेक लेख लिहून वैदिक संस्कृती व संस्कृत भाषा यांच्या प्रचार प्रसाराला बळ दिले.
सातवळेकर कुटुंब वेदसंपन्न आणि विद्वत्ता लाभलेले होते. त्यामुळे वेदाचा वारसा हा आपसूकच त्यांच्याकडे आला. एकीकडे वेदाध्ययन पूर्ण झालेले सातवळेकर चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी या कलांमध्ये देखील निपुण होते. लोकमान्य टिळकांशी त्यांचा परिचय झाला. त्यावेळी त्यांनी केसरीत काही लेख लिहिले. त्यांनी विवेकवर्धिनी हायस्कूल, कन्याशाळा, व्यायामशाळेची स्थापना केली, असे त्या म्हणाल्या.

डॉ. काणे यांचे कार्य अद्वितीय- स्नेहा सप्रे
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र विषयवार केलेले कार्य कालातीत आहे. ते नेहमीच निरंतर कार्यमग्न होते. त्यामुळे इंडोलॉजी व धर्मशास्त्राचे अध्ययन-अध्यापन चालू असेपर्यंत डॉ. काणे विसरले जाणार नाहीत, असे प्रतिपादन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ एडीपी अँड ॲकॅडमिक इन्चार्ज श्रीमती स्नेहा सप्रे यांनी केले.
त्या म्हणाल्या की, डॉ. काणे यांनी सुरुवातीस क्रमश: अध्यापनाचे कार्य केले व त्यानंतर त्यांची पावले वकिली क्षेत्राकडे वळली. हिंदूंच्या दायभाग, विवाह यासारख्या विविध विषयावर डॉ. काणे संदर्भासहित बोलत असत. स्वातंत्र्यानंतर हिंदुकोडबाबत डॉ. काणे यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. वकिली क्षेत्रात वावरताना काणे यांना सामाजिक जाणीवेचे देखील भान होते. पंढरपूर येथे विधवा महिलेला प्रवेश नाकारणे व हरिजनांना गणपती मंदिरात प्रवेश बंदी या दोन प्रकरणांचा सप्रे यांनी उल्लेख केला. या दोन्ही प्रकरणात डॉ. काणे यांनी आपले युक्तिवादाचे कौशल्य वापरत न्याय मिळवून दिला. गोरगरिबांचे व गरजू लोकांचे डॉ काणे निशुल्क खटले लढवीत असत. डॉ. काणे यांच्या कार्याचा आवाका बराच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button