ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे १ सप्टेंबरपासून उघडले जाणार
मालवण येथे असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे १ सप्टेंबरपासून उघडले जाणार आहेत. पावसाळ्यात शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी केलेली असते.दरम्यान किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद असते. आता लवकरच किल्ल्याचे दरवाजे खुले होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचेही काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले असून लवकरच किल्ल्याचे रूप पालटल्याचे आपणास पाहावयास मिळणार आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण येथील मुख्य जेटीवरून मोठ्या नौकेत बसून समुद्रातून प्रवास करावा लागतो. हा एक वेगळाच अनुभव असतो. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो.सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचे प्रस्ताव पुरातत्त्व विभागासमोर आहेत. यानुसार किल्ल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. –
www.konkantoday.com