रत्नागिरी शहरात लवकरच आधुनिक एलईडी सिग्नल सुरू होणार
रत्नागिरी शहरात लवकरच आधुनिक एलईडी सिग्नल सुरू होणार असून त्याच्या उभारण्याचे काम सध्या जेल नाका येथे सुरू झाले आहेशहरातील जयस्तंभ, जेलनाका, मारूती मंदिर सर्कल, रामनाका, गोखलेनाका या ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे
रत्नागिरी शहरातील सिग्नल यंत्रणा अनेक वर्ष बंद झाली होती. कोरोना काळात वाहतूक पोलिसांकडून सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यानच रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामासाठी रस्ते खोदाई करावी लागली. ही कामे करताना काही सिग्नलच्या विद्युत केबल तुटल्या गेल्या. मारुती मंदीर येथील शिवसृष्टीच्या कामासाठी याठिकाणचे सिग्नलचे खांब काढावे लागले होते. रत्नागिरी शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असल्याने वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा आवश्यक झाली होती.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे सिग्नल यंत्रणा सुरु करण्याबाबत पत्र व्यवहार सुरु केला. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे गेल्यानंतर सुमारे 50 लाख रुपयांची निधी मिळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. आता हा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून 20 मार्चला सिग्नल यंत्रणेसाठी जुन्या सिग्नल यंत्रणेच्या जागी नवीन आधुनिक एलईडी सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी मंजूरी देण्यात येउन निधीही वितरीत झाला.
शहरातील जयस्तंभ, जेलनाका, मारूती मंदिर सर्पल, रामनाका, गोखलेनाका या भागात ही सिग्नल व्यवस्था उभारण्यात येणार आहे. आता शहरात या चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या कामाला वेग घेतला आहे.
www.konkantoday.com