आता पत्रकार बस स्थानकातील गैरसोईबाबत आंदोलन करणार
दापोली बसस्थानकात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत मराठी पत्रकार परिषद शाखा दापोली यांच्यावतीने १ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.दापोली हे एक महत्वाचे आगार आहे. दापोली हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेला तालुका आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय दापोलीत असल्याने अनेक प्रवासी दापोली बसस्थानकातून प्रवास करतात. असे असूनही दापोली बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच आगारामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. दापोली बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बसेसना गळती लागली असून, त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्या वारंवार बिघडत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. शिवशाही बसेसमधील वातानुकूलित यंत्रणा अनेकवेळा बंद पडते. मुंबई महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या बसेस आपटून नादुरुस्त होत आहेत. या बसेस अन्य आगारांमध्ये वर्ग करून दापोली आगाराला नव्या प्रकारच्या हिरकणी बसेस देण्यात याव्यात.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये यांत्रिकीविभागाची अनेक पदे रिक्त असल्याने महामंडळाच्या बसेसची दुरुस्तीची व अन्य कामे वेळीच होत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती करावी. दापोली बसस्थानकातून सकाळी ६.३०ची जलद रत्नागिरी, ७ ची पुणे-शिर्डी, सकाळी ९ ची दापोली-अक्कलकोट, सायंकाळी ७ ची दापोली-अक्कलकोट, दुपारी १२ची उन्हवरे मुंबई व २ ची दापोली-कोल्हापूर या बसेस प्रवाशांच्या मागणीनुसार त्वरित सुरू करण्यात याव्यात अन्यथा १ सप्टेंबरपासून आगारासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
www.konkantoday.com