रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश जाहीर -अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश जाहीर
करण्यात आला असून पुढील वर्षी तीस टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेस डॉ. चोरगे बोलत होते. या वेळी आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, कार्यकारी संचालक अजय चव्हाण, संचालक मंडळ आदी उपस्थित होते. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे. सोसायट्यांनी आपल्या सभासदांना लाभांश देण्याइतपत आर्थिक व्यवहार करावा असा सल्ला डॉ. चोरगे यांनी दिला. भविष्यात सहकारी सोसायट्यांनी आपला आर्थिक व्यवहार वाढवून स्वावलंबी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय अद्यापही कायम आहे. तरूण वर्गाने शेतीकडे दुर्लक्ष करून मुंबई उपनगरात व्यवसाय, नोकरीचा पर्याय स्वीकारल्याने भातशेती धोक्यात आली आहे. भातशेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सोसायट्यांसह सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. भातशेतीचा व्यवसाय टिकणे काळाची गरज आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेने निर्लेखित केलेल्या १०३ कोटी रुपयांपैकी ५८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जवळपास ५६ टक्के वसुली संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केल्याने डॉ. चोरगे यांनी समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com