वकिलीच्या व्यवसायातील दीपस्तंभ अँडव्होकेट सी.के.तथा बापूसाहेब परुळेकर यांचे दु:खद निधन–रत्नागिरीच्या वकीली व्यवसायातील एका सुवर्णपर्वाचा अंत
(अँड. धनंजय जगन्नाथ भावे रत्नागिरी)
रत्नागिरीमधील जेष्ठ आणि ख-या अर्थाने श्रेष्ठ असलेले ॲड. बापूसाहेब परूळेकर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी आज दिनांक 27 जुलै 2023 रोजी सकाळी दु:खद निधन झाले.
रत्नागिरीच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्वाचे योगदान दिलेले आहे. खर तर असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यामध्ये रत्नागिरीचे नाव अभिमानाने घेतले जावे अशी व्यक्ती नाही. वकिली हे असे क्षेत्र आहे की कुणालाही असा प्रश्न पडेल की यामध्ये असे काय महत्वाचे योगदान असू शकते ? खर आहे म्हणा ते ! कारण वकील पक्षकाराकडून त्याची फी घेतो त्याची बाजू कोर्टामध्ये मांडतो, त्याचे पुरावे कोर्टासमोर ठेवतो आणि कोर्ट त्याबाबत अनुमान/निष्कर्ष काढून त्याच्या प्रकरणाचा निकाल देतो. या वकिलाने शिताफीने याला सोडवला, त्याला निर्दोष शाबित केला अशा बातम्या आपण वृत्तपत्रातून अलीकडे वाचतच असतो. पण याही पलीकडे जाऊन वकिलीच्या क्षेत्रामध्ये काही वेगळे योगदान देण्याचे, नवीन पिढीसमोर वकिलीचा व्यवसाय कसा करावा याचा आदर्श ठेवण्याचे योगदान देण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यायचे झाल्यास माननीय बापूसाहेब परुळेकर वकील यांचेच घ्यावे लागेल आणि कायद्याच्या व्यवसायातील अनेक वकील तेच नाव निर्विवादपणे घेतील यात शंकाच नाही.
तत्कालीन रत्नागिरी जिल्हा म्हणजेच सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा एकत्रित जिल्हा यांचे मुख्य न्यायालय रत्नागिरी येथेच होते. मा. बापूसाहेब यांनी सन १९५१ मध्ये त्यांचे काकांचे मार्गदर्शनाखाली आपला वकिलीचा व्यवसाय सुरु केला. या क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये मा. पंडित, नानल, बर्वे, चितळे, जोशी असे मोजकेच नामांकित वकील वकिलीच्या व्यवसायामध्ये अग्रणी होते. हे सर्व बापूसाहेबाना म्हटलं तर ज्येष्ठ असे होते. वकिलीच्या व्यवसायामध्ये सर्वात प्रथम मा. बापूसाहेब यांनी पहिला कोणता आदर्श घालून दिला असेल तर ज्येष्ठांचा मान, त्यांचा आदर सर्वांशी नम्रपणाची वागणूक. मा. बापूसाहेब यांनी यामध्ये न्यायिक अधिकारीही वगळले नाहीत. मान ठेवावा आणि मान घ्यावा याचा उत्तम आदर्श मा. बापूसाहेब यांनी यांनी घालून दिला आणि व्यवसायातून वार्धक्यामुळे निवृत्ती घेईपर्यंत तो जपला आहे हे आजही त्यांची प्रत्यक्ष भेट घेणाऱ्या वकिलांनाच नव्हे तर कोणाही सर्व सामान्य परिचित किवा अपरिचित व्यक्तींनाही येईल यात शंकाच नाही. कोर्टासमोर युक्तिवाद करताना किवा पुरावा सादर करतांना समोरून काही वाद निर्माण झाले तरी भाषेमधील मृदुता कधीही सोडवायची नाही हे तत्व मा. बापूसाहेब यांनी तंतोतंत पाळले. एकदा असे घडले की पुराव्याच्या वेळी मे. न्यायाधीश आणि वकील यांचे दरम्याने काही वाद निर्माण झाला. न्यायाधीश महोदय तरुण होते. कोर्टासमोर मा. बापूसाहेब यांनी त्याबाबत चकार शब्द काढला नाही. का कोणास ठावूक त्या न्यायाधीश महोदयांनी त्यांचे चेंबर मध्ये मा. बापूसाहेब यांना बोलावून घेतले आणि अल्पशा प्रमाणात दिलगिरी व्यक्त केली. खरे तर हीच संधी न्यायाधीश महोदय यांना सुनाविण्याची होती. मा. बापूसाहेब यांनी दिलगिरी मान्य केली पण त्याचवेळी त्यांना नम्रपणे वडीलकीच्या भावनेने सांगितले की मी व्यवसाय सुरु केला त्यावेळी तुम्ही पाळण्यात होतात आणि माझा किवा कोणाचाही मृदुपणा हा घाबरटपणा समजू नका कारण तुम्हाला चांगल्या आणि अधिक उच्च पदावर जायचे आहे. (I have started my practise while you were in cradle and secondly Do not take my/anybody’s softness as cowardness) अनेक वर्षांच्या प्रक्टिस नंतरही ते व्यवसायामध्ये अजातशत्रू राहिले याचे हेच गमक असावे!
वकिली हा व्यवसाय निवडल्यानंतर मा. बापूसाहेब कसे कसे घडले हे त्यांनीच अधून मधून त्यांचेशी होणाऱ्या वार्तालापामधून उलगडले आहे. त्यांचे हाताखाली ज्युनिअर म्हणून काम केलेल्या वकिलांच्या स्वतंत्र कार्यालयात गेल्यावर तेथील कामाची पध्दत पाहिल्यानंतर आजही कोणीही हे ओळखू शकेल की हा मा. बापूसाहेब यांचा ज्युनिअर होता. पक्षकार याने मा. बापूसाहेब यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यापासून त्याचे काम अंतिमत: संपेपर्यंत त्याचे सर्व रेकॉर्ड कसे ठेवावयाचे त्याचा मा. बापूसाहेब यांनी खरच आदर्श घालून दिला होता. पक्षकार ऑफिसमध्ये आल्यानंतर अशा विशिष्ट पद्धतीमुळे त्याचे कागद शोधणे हा प्रकार कधीच करावा लागत नसे. तारीखवार केसेस लावून ठेवणे, त्यांची अद्यावत डायरी ठेवणे, त्यांना रजिस्टर नंबर देणे ही कामे मा. बापूसाहेब यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वत:च केली. नंतर त्याचे अनुकरण त्यांनी त्यांचे कारकून/ज्युनिअर यांचेकडून करवून घेतले. कोर्टाच्या तारखांचा आठवड्याचा बोर्ड/दैनंदिन बोर्ड याची सवय आणि पध्दत मा. बापूसाहेब यांनीच त्यांचे कामामध्ये आणली. आलेल्या पक्षकाराला “अरे आज तुमची तारीख आहे वाटतं ” असे म्हणणे हे मा. बापूसाहेब यांना अत्यंत कमीपणाचे वाटत असे. असे कधीही घडता कामा नये असा त्यांचा सातत्त्याने आग्रह होता आणि आजही त्यांचे तसेच मत कायम आहे. पक्षकाराचे काम संपल्यानंतर त्याने कागदपत्र परत घेतले याचेसुद्धा रजिस्टर मा. बापूसाहेब यांनी स्वतंत्रपणे ठेवले असायचे. व्यवसायामध्ये प्रथम कार्यालयाचा उत्तम गृहपाठ आणि त्यानंतर वकिलीचा व्यवसाय हे सूत्र मा. बापूसाहेब यांनी अत्यंत कठोरपणे आणि नित्यनेमाने पाळले आणि ते त्यांच्या प्रदीर्घ यशस्वी व्यवसायाचे एक महत्वाचे कारण आहे असे ते अभिमानाने सांगतात.
प्रत्यक्षात वकिली करताना तर त्यांनी घेतलेले कष्ट अफाट आहेत. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास पूर्वी वीज नव्हती किवा काही पुरेशीही नसायची. त्या काळामध्ये दिवा तेवतोय तो पर्यंत केसचा अभ्यास करावयाचा आणि मग उजाडल्यावर पुढे चालू करावयाचा अशाप्रकारे मा. बापूसाहेब यांनी काम केले. वाचन आणि वारंवार वाचन हे मा. बापूसाहेब यांच्या अभ्यासाचे सूत्र होते. आजही मार्गदर्शन करतांना ते सांगतात की पक्षकाराचे म्हणणे ऐकून झाल्यावर प्रथम संबंधित कायद्याचे पुस्तक काढून तरतूद वाचणे आवश्यक आहे. कायदा कितीही पाठ असला तरी त्याचे वारंवार वाचन पाहिजेच असा त्यांचा परिपाठ होता. वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे निकाल रेफरन्स साठी मिळावेत म्हणून मा. बापूसाहेब यांनी स्वत:ची लायब्ररी उत्तम आणि अद्ययावत ठेवली. सुदैवाने जागा भरपूर होती पण त्याचा उपयोग याच कारणासाठी करावयाचा हे त्यांनी नक्की ठरविलेच होते. जुन्या निकालपत्राच्या माहितीसाठी त्यांनी त्यांचे ज्युनिअर सोडाच कोणाही सहकारी वकील मित्रास त्यांची लायब्ररी उपलब्ध करून दिली होती. परगावाहून येणाऱ्या अनेक वकीलांनी त्याचा खूप फायदा करून घेतलेला आहे हे विशेष. न्यायालयामध्ये युक्तिवाद करतांना कोर्टाला प्रथम कायदा समजावून सांगायचा आणि केवळ त्याचे पुष्ट्यर्थ उच्च न्यायालयाचे निकालांचे दाखले द्यावयाचे हे तत्व मा. बापूसाहेब यांनी आपल्या प्रक्टिसच्या संपूर्ण काळामध्ये पाळले आणि अनुभवलेही. त्यांचे काळामध्ये कोर्टाचे काम इंग्रजीमधून चालायचे. भरपूर वाचनाने मा. बापूसाहेब यांनी ती भाषा आणि तिचा उपयोग समृद्धपणे न्यायालयामध्ये केला. त्यांचा युक्तिवाद ऐकताना आपला निकाल समोरील पुराव्यावर न होता युक्तिवादावर तर बदलणार नाही ना अशी भीती तत्कालीन न्यायिक अधिकारी यांना वाटत असली तर नवल नव्हे अशी समृद्ध मा. बापूसाहेब यांची भाषा होती. यातूनच मा. बापूसाहेब यांची वकिलीच्या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि त्यांनी या व्यवसायातील एक नामांकित वकील म्हणून खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त केला. अर्थातच त्यांच्या या कार्यपद्धतीने मा. बापूसाहेब यांनी दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही क्षेत्रामध्ये असे नाव कमावले. मुंबई, कोल्हापूर इत्यादी ठिकाणाहून त्यांना कामांची ऑफर येत होत्या पण आपले कार्यक्षेत्र नेमके ओळखून मा. बापूसाहेब यांनी रत्नागिरी जिल्ह्यामधून कोठेही जाण्यास नम्रपणे नकार दिला आणि त्यातही त्यांची भावना अशी होती की मी बाहेरगावी गेलो तर माझ्या येथील पक्षकारांचे नुकसान होईल. तरीही त्यांना कोल्हापूर येथे अनिवार्य आग्रहामुळे काही कामकाजासाठी जावे लागलेच, पण त्या काळामध्ये अन्य वकिलांची उपलब्धता असल्याने त्यांना ते शक्य झाले. प्रामाणिकपणे काम करण्याच्या मा. बापूसाहेब यांच्या कार्यपध्दतीमुळेच रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यांच्या केसेस सिंधुदुर्ग येथे गेल्या तरीही पक्षकार त्यांना सोडून गेले नाहीत. मा. बापूसाहेब यांनी त्यांना नम्रपणे विनंती केली की त्याठिकाणी वकील उपलब्ध आहेत मला आता वयोमानानुसार काम जमणे कठीण वाटते. तरीही पक्षकारांनी त्यांना आग्रह केला त्यामुळे मा. बापूसाहेब यांनी त्या केसेस पूर्ण केल्या मात्र नवीन काम मी स्वत: घेणार नाही याच अटीवर.
दरम्यानचे काळामध्ये मा. बापूसाहेब काम करीत असलेल्या राजकीय पक्षाच्या आग्रहामुळे त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व स्वीकारून ते दोन वेळा खासदार झाले. पण तेथेही कायद्यातील तरतुदीबाबतच त्यांनी विविध विषयावर लोकसभेमध्ये विधेयकेही मांडली हे विशेष. लोकसभेतील त्यांच्या कालावधीमधील कामकाजाच्या पुस्तकांचे जतनही त्यांनी वकीली व्यवसायामधील पुस्तकांइतकेच व्यवस्थितपणे करून ठेवले होते. अधून मधून एकादी राजकीय घटना घडली तर बापुसाहेब त्याबाबतच्या लोकसभेमधील चर्चेची माहिती त्या पुस्तकांमधून शोधून काढून विवेचन करीत असत. वकील म्हटले म्हणजे कोणीतरी एक विरुद्ध पक्षकार असतोच, पण लोकसभेची निवडणूक लढविताना सर्वानीच त्यांना सहकार्य केले हेही त्यांच्या निर्गर्वी आणि नम्र वकिली व्यवसायाचेच फळ म्हणावे लागेल. लोकसभेच्या खासदारकीच्या कालावधीमध्येही त्यांनी व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली होती. राजकीय नेतृत्व करताना देखील मा. बापूसाहेब यांनी ते इतक्या समर्थपणे केले की त्याकाळामध्ये एका मोठ्या मोर्चाचे वेळी त्यांचे एका शब्दावर ऐकणारी अनेक लोकं होती. लोकांनी दगडफेक करू नये यासाठी एकदा तर जिल्हाधिकारी यांनी भीतीने मा. बापूसाहेब यांना जवळ धरून ठेवले होते हे अनेकांनी पहिले आहे. त्यांना मानणारी माणस त्यांना एक आदरणीय वकील म्हणूनच मानत होती याविषयी शंकाच नाही.
मा. बापूसाहेब परुळेकर यांनी आपल्या अपरंपार कष्टाने, मेहनतीने, प्रामाणिकपणे, शिस्तीने आपले वकिलीचे व्यवसायामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच एक वेगवेगळा आदर्श आणि दबदबा निर्माण केला होता. अलिकडेच दिनांक 11 जुलै रोजी बापुसाहेबांनी वयाची 95 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या दु:खद निधनाने रत्नागिरीमधील वकीलीच्या व्यवसायातील दीपस्तंभ आणि वकीलीच्याच व्यवसायातील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे असेच म्हणावे लागेल. परमेश्वर कै. बापुसाहेबांच्या आत्म्याला सदगती देवो ही प्रार्थना..