भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने दिले जीवदान
राजापूर पाचल येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप विहिरीबाहेर काढून वनविभागाने जीवदान दिले. राजापूर तालुक्यातील तळवडेपैकी वाकाडवाडी येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुमारे सहा महिन्यांचा हा बिबट्या मादी जातीचा आहे, अशी माहिती रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी दिली आहे.
तळवडेपैकी वाकाडवाडी येथील ग्रामस्थ सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती तलाठी अजित पाटील यांनी राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांना दिली. घाडगे यांनी रत्नागिरी वनक्षेत्रपाल यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली असता भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.
या विहिरीला कठडा नाही तसेच विहीर जवळपास तीस फूट खोल असून घेरा पंधरा फूट आहे. विहिरीचा काठ ठिसूळ असून सतत माती व दगड पडत होते. विहिरीमध्ये बिबट्या व मांजर दिसले. मात्र, हे मांजर मृत होते. विहिरीत पिंजरा साेडून दुपारी १२:२५ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आले.
www.konkantoday.com