रत्नागिरी तारांगणाच्या आकाशदर्शन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद
रत्नागिरी नगरपरिषदेच्या श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे आयोजित केलेल्या आकाशदर्शन आणि दुर्बीणीतून ग्रहदर्शन कार्यक्रमाला रत्नागिरीकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहभागाने रत्नागिरीकर खगोलप्रेमींनी आकाशदर्शनाचा आनंद लुटला. वातावरण प्रारंभी थोडेसे ढगाळ असूनही नागरिकांचा उत्साह उत्तम होता.
सायंकाळी ७ ते ९ या वेळात जवळपास तीनशे आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महाविद्यालयातील दोन दुर्बीणीतून उपस्थितांनी शुक्र ग्रह तसेच चंद्राचेही दर्शन घेतले. या कार्यक्रमासाठी लहानग्या शालेय विद्यार्थ्यांची विशेष हजेरी लक्षात येण्याजोगी होती. प्रा. बाबासाहेब सुतार यांनी गटागटाने उपस्थितांना प्राथमिक आकाशदर्शन घडवले. सप्तर्षींच्या सहाय्याने उत्तर दिशा शोधणे तसेच स्वाती, चित्रा, व्याध ई. ताऱ्यांची माहिती दिली. दिनांक ७ मे रोजी अनुभवता येणाऱ्या शून्य सावली आविष्काराची माहितीही पोस्टर द्वारे दिली. रत्नागिरी येथील हौशी खगोलप्रेमी श्री.उपेंद्र बापट यांनी गेले दोन आठवडे नियमितपणे घेतलेल्या चंद्राच्या फोटोंचा खजिनाच बालचमूला दाखविला.
तारांगण समन्वयक श्री. जितेंद्र विचारे यांनी तारांगणाचे भविष्यातील थ्रीडी शो तसेच इतर उपक्रम यांविषयी उपस्थितींना माहिती दिली.
तारांगणाच्या या पहिल्याच उपक्रमाबाबत रत्नागिरी करांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तारांगण कर्मचारी तसेच दुर्बीणी हाताळण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी सम्यक हातखंबेकर व अक्षय साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.