..आणि कार्तिकस्वामी दर्शन खुले झाले !!! (देवाक काळजी) आशुतोष बापट

शिव पार्वतीचा पुत्र कार्तिकेयाचे दर्शन घेऊ नये असा एक अपसमज आपल्याकडे आहे. दक्षिण भारतात तर कार्तिकेयाचे दर्शन पवित्र समजतात. तिथे चौकाचौकात त्याची देवळे आपल्याला दिसतील. परंतु आपल्याकडे असलेल्या काही अपसमजामुळे कार्तिकेयाचे स्तियांनी घेतलेले दर्शन निषिद्ध मानले गेले होते. चिपळूण इथल्या विंध्यवासिनीच्या देवळात देवीच्या शेजारीच कार्तिकेयाची नितांतसुंदर मूर्ती आहे. मूर्ती अंदाजे इ.स.च्या १३व्या शतकातली असावी. मात्र ती मूर्तीचे दर्शन स्त्रियांना होऊ नये म्हणून त्यावर वस्त्र पांघरून ठेवले जात असे. त्यामुळे ती इतकी देखणी मूर्ती कुणालाही बघता येत नसे. शिल्पकलेचा इतका अत्युच्च नमुना हा असा झाकून गेला होता.

याबद्दल विविध व्यक्तींशी स्वतंत्रपणे बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही मनात ही मूर्ती सर्वांना दर्शनासाठी खुली असावी असाच कल होता. या महिन्यात भटकंती चिपळूण-गुहागर परिसराची या पुस्तकाच्या निमित्ताने चिपळूणला जायचे होते. सोबत गुरुवारी देगलूरकर सरसुद्धा होते. त्यानिमित्ताने एकदा मंदिराच्या सगळ्या विश्वस्तांशी संवाद साधता यायला हवा असा विचार केला. त्यासाठी श्री. प्रकाश देशपांडे आणि श्री. धनंजय chitale या चिपळूणमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी केली आणि सकाळी अगदी लवकर विंध्यवासिनीदेवीच्या देवळातच सगळ्या विश्वस्तांसोबत बैठक ठरली. अनेकांच्या अनेक शंकांचे श्री. देगलूरकर सरांनी निरसन केले. ही मूर्ती सगळ्यांना दर्शनासाठी खुली करावी, त्यात पाप ते काहीच नाही, विपरीतसुद्धा काही नाही, पुण्याला पर्वतीवर असलेल्या कार्तिकेयाच्या मंदिरातदेखील सर्वांना कायम प्रवेश आहे हे सुद्धा समजवून सांगितले. अत्यंत आनंदाची बाब म्हणजे सगळ्या विश्वस्तांनी एकमुखाने आणि आनंदाने आता ही मूर्ती सर्वांना दर्शनासाठी खुली करयाची असा निर्णय घेतला. आणि लगेचच त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. याकामी मंदिराचे पुजारी श्री. संतोष साठ्ये यांचासुद्धा मोलाचा हातभार लागला. ह्या सगळ्या घडामोडींमध्ये माझा खारीचा वाटा होता याचा सार्थ अभिमान वाटतो.

आता आपण चिपळूणला गेलात की मुद्दाम आवर्जून विंध्यवासिनीच्या मंदिरात जावे. देवीची मूर्ती तर अप्रतिम आहेच पण तिच्याच शेजारी असलेल्या कार्तिकेयाची अत्यंत देखणी कलाकृती डोळे भरून बघावी. आदरणीय देगलूरकर सर आणि या मंदिराच्या सगळ्या विश्वस्तांमुळे हे शक्य झाले.

सामाजिक सुधारणा करण्यासाठी कोकणी माणूस कायम अग्रेसर असतो याचे हे ज्वलंत उदाहरण. पुन्हा एकदा कोकणवासियांनी सुधारणेचे हे पाऊल उचललेले केवळ अभिमानास्पद आहे. देवीच्या उत्सवातच कार्तिकेयाच्या मूर्तीवरचे वस्त्र काढले गेले. अनेक स्त्रियांनी त्याचे मनसोक्त दर्शन घेतले. पुजारी श्री साठ्ये यांनी आपल्या भावना मांडताना सांगितले की दरवर्षी देवीच्या उत्सवात कार्तिकेयाला झाकून ठेवावे लागायचे. या वर्षी कार्तिकेयाने देवीचेसुद्धा मनसोक्त दर्शन घेतले असेल याचा आनंद होतो आहे. हे सांगताना श्री.साठ्ये यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते.

खरंच एखादी चांगली गोष्ट व्हायची असेल तर त्यासाठी परिस्थितीसुद्धा अनुकूल होते. देगलूरकर सरांनी सगळ्यांना समजावून सांगणे आणि सगळ्या विश्वस्तांनी ते ऐकून त्याची अंमलबजावणी करणे यासारखे दुसरे सुख नाही. कितीतरी वर्षांनी आता कार्तिकस्वामी आपल्या भक्तांकडे आनंदाने बघत आहेत. देवाक काळजी दुसरं काय …!!!www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button