आज 23 मार्च भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा 89 वा हौतात्म्य दिन.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या या क्रांतीवीर त्रयीना भावपूर्ण श्रद्धांजली आणि शत शत नमन !
यानिमित्ताने रत्नागिरीशी निगडित एका महत्त्वाच्या प्रसंगाची माहिती देण्यासाठी हा लेख प्रपंच.
लाहोर कटाचा आरोप ठेवुन चाललेल्या खटल्यात भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली. तिघांनाही लाहोर येथील मध्यवर्ती कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आले होते व तिथेच त्यांना 24 मार्च 1931 रोजी सकाळी फाशी देण्याचे ब्रिटिश सरकारने ठरविले होते.
परंतु असे असताना 23 मार्च रोजीच्या पडद्याआडच्या घडामोडींमुळे, वरिष्ठ स्तरावरून ही फाशी बारा तास आधी देणेबाबत आदेश काढले गेले. त्यामुळे ही फाशी प्रत्यक्षात 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी ७ वाजता देण्यात आली.
याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. परंतु मुळातच क्रांतीसूर्य असलेल्या तात्याराव सावरकरांनी या राजकीय बंदिवास काळात सुद्धा आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालूच ठेवली होती. सशस्त्र क्रांतीपर्वानंतर रत्नागिरी येथे सामाजिक समरसता पर्वास त्यानी सुरुवात केली होती.
सर्व हिंदू बांधवांना देवळाच्या गाभार्यात जाऊन ईश्वराची पूजा करण्याचा हक्क देणाऱ्या पतितपावन मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फाल्गुन शुद्ध पंचमीला म्हणजेच 22 फेब्रुवारी 1931 रोजी झाला. हा देशभर गाजलेला जनजागृती सोहळा तात्याराव सावरकर यांनी संपन्न केला होता. परंतु असे जरी असले तरी स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांती युद्धातील सेनानी असल्यामुळे त्यांचे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या विरोधात चालू असलेल्या खटल्याकडे बारीक लक्ष होते. न्यायालयाने क्रांतिवीर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावली. या घटनेने सावरकरांना अपार दुःख झाले.
या फाशीच्या शिक्षेच्या बातमीने झालेल्या मनाच्या उद्वेगातुन तात्याराव सावरकर यांनी
*हा भगतसिंग हाय हा!
अशा वर्णनाच्या कवितेची रचना केली. इतकेच नव्हे तर क्रांतिवीरांच्या फाशी जाण्याच्या दिवशी या कवितेचे सार्वजनिकरित्या गायन करून फाशी जाणार्या तीनही क्रांतिकारकांना मानवंदना देण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ठरविले. यासाठी ती कविता रत्नागिरीतील हिंदू तरुण मंडळातील तरुणांकडून सावरकरांनी गुप्तपणे पाठही करून घेतली,आणि ठरल्या वेळेच्या बारा तास आधी जरी सरकारने या क्रांतिकारकांना फाशी दिली तरीही फाशी देण्याच्या नेमलेल्या वेळी म्हणजेच २४ मार्च १९३१ रोजी पहाटेस पोलीस पूर्ण सावध होण्याच्या आधीच या निवडक तरुणांनी सावरकर रचित हे गीत गात गात, रत्नागिरी नगरातून प्रभातफेरी काढली आणि सारे रत्नागिरी नगर भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या व स्वातंत्र्य लक्ष्मीच्या जयजयकाराने दुमदुमवुन टाकले.
फाशी दिलेल्या क्रांतिवीरांना केलेल्या या गीतमय अभिवादना चे पडसाद इंग्रज सरकारच्या सर्व दालनात तीव्रपणे उमटलें. पोलिसांमार्फत चौकशीही झाली, परंतु हे गीत कोणी रचले आणि कोणी गायले याबाबत कोणतीही माहिती सरकार दरबारी दाखल होऊ शकली नाही.
हे गीत गाणाऱ्या हिंदू तरुण मंडळातील सहभागी झालेल्या तरुणांपैकी श्री. मोरेश्वर तथा मोरुभाउ आचरेकर ही शेवटची हयात व्यक्ती होती व त्यांचे आठ दहा वर्षांपूर्वीच देहावसान झाले. यांच्याकडून या घटनेची माहिती ऐकण्याचे भाग्य अनेक रत्नागिरीकरांना लाभले होते.
सावरकरांसारख्या क्रांतीसूर्याकडून हौतात्म्या बद्दल काव्यमय मानवंदना लाभलेल्या या तीनही क्रांतिकारकांना स्वतंत्र्य भारताच्या सुरुवातीच्या अनेक वर्षांमध्ये हे भाग्य लाभले नाही. त्यांना न्यायालयाकडून फाशी देणेचा आदेश करणेत आला तो फेब्रुवारी 14 फेब्रुवारी हा दिवस. आज आपली तरुणाई व्हॅलेंटाईन डे म्हणूनच लक्षात ठेवते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु भारतीय तरूणाईच्या या मानसिकतेत बदल घडविण्याची आपलीही जबाबदारी आहे. बदलत्या काळात पूर्वीची ही मानसिकता बदलते आहे ही गोष्ट आशादायी आहे
भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीनही क्रांतिवीर हुतात्म्यांना आजच्या या 89 व्या स्मृतीदिनी माझी विनम्र आदरांजली आणि शत शत नमन!
- बाबा परूळेकर रत्नागिरी