‘रुका’ सोबत पाऊण तास

काल दिवसभरात, घरालगतची झाडे वाढून पावसाळ्यात पत्रे-भिंती खराब होऊ लागल्याने जवळच्या आंबा-उंबराच्या फांद्या तोडल्या आणि सायंकाळी दैनंदिन जगण्यातील गडबड जाणवलेला बिनविषारी ‘रुका’ वृक्षसर्प (common Bronzback tree snake) थेट घरात शिरला.

साधारणतः पाऊण तास रुकाचा आमच्या सोबतीने घरात वावर होता. तो घरात असताना एका बाजूला आम्ही सर्पमित्रांना फोन करत होतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर नजर ठेवून ठेवण्यात गर्क होतो. अखेर सर्पमित्र केतन मांजरेकर याने ‘रुका’ला पकडले पाठोपाठ सर्पमित्र अनिकेत चोपडेही पोहोचला. रुकाला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले. मात्र तत्पूर्वी सडपातळ शरीराचा आणि लांब ‘रुका’ घरभर फिरत असतानाचा पाऊण तास ‘रुका सोबत पाऊण तास’ लिहावं इतका अफलातून होता. सायंकाळच्या सुमारास आम्ही बाहेरून घरी परतताना अंगणातील कचऱ्यात याची सळसळ आम्हाला जाणवली. बिनविषारी सापांचा वावर आमच्या परिसराला तसा नवीन नाही. पण घरात येण्याची ही पहिली घटना. रुकाला अंगणात पाहिलं तेव्हा वाटलेलं हा आपल्या आल्या मार्गानं जाईल. पण तो बावचळला असावा. घराच्या एका उघड्या खिडकीतून रुका आत शिरला. खिडकीजवळच्या खोलीतील पुस्तकांच्या कपाटावरील भ्रमंती आटोपून तो चक्क देवघरात शिरला तेव्हा मला क्षणभर आजची ‘महाशिवरात्र’ आठवली होती.

कुटुंबातील सदस्यांच्या काळजीने पाऊण तासात आमच्याही हृदयाचा ठोका वाढला होता. शेवटी देवघरातून देवदर्शन आटोपून रुका बाहेर पडला आणि थेट जवळच्या बेडरूममध्ये शिरला तिथे तो अडगळीत निवांतपणा शोधत होता. इतक्यात सर्पमित्र केतन पोहोचला आणि त्याने ‘रुका’ला अलगद पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

धीरज वाटेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button