एक संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…. उदय सामंत
एक संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….
प्रेरक नेते,
शेतकरी पुत्र,
अनाथांचे नाथ,
कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी,
राज्याचं लोकप्रिय नेतृत्व,
बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार अशी अनेक विशेषणे ज्यांना शोभतात ते ‘लोकनेते’ एकनाथजी शिंदे होय.
सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी मिळत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील ते असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात. आज राज्यातील प्रत्येकाला ते आपले मुख्यमंत्री वाटतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीशी जाणीव आहे. विशेषत: सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामांबद्दल ते स्वत: लक्ष घालून तळमळीने सगळी कामे करून घेतात. जनतेला भावलेले एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लोकांचे मुख्यमंत्री ( People’s Chief Minister ) ही ओळख त्यांची निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर न भूतो न भविष्यतो असा उठाव करून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे सर्वसामान्य नागरिकांचे ‘आपले सरकार’ राज्यात आले. या सरकारचे नेतृत्व आज एकनाथजी शिंदे हे करीत आहेत. आज त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री म्हणून काम करीत असताना शेवटच्या घटकांचा विचार करीत निर्णय घेतले जात आहेत.
एकनाथजी शिंदे यांनी अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी होता. मुळामध्ये शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती होती. मात्र, शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आणि महाराष्ट्राच्या जनतेवर चुकीच्या पद्धतीने लादलेला होता. मात्र, माननीय एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील जनतेच्या मतांचा विचार करीत अनैसर्गिक युतीतून बाहेर पडत पुन्हा एकदा नैसर्गिक युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, हे आपले सरकार आहे. विरोधकांना वाट्टेल ते आणि अगदी खालच्या पातळीला जाऊन ते टीका करिताहेत मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, विरोधकांना विकासातून उत्तर द्या! विरोधकांना आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो मात्र, आपल्यावर राज्याच्या जनतेने जी जबाबदारी टाकलेली आहे ती राज्याच्या सर्वांगीण विकासाची आहे न की विरोधकांना उत्तर देण्याची! आम्ही सामान्य नागरिकाला समोर ठेऊन राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धतेने काम करीत आहोत. उद्योग खात्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून या माध्यमातून स्थानिकांना आणि तरुणांच्या हाताला काम मिळत आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथे जानेवारी महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित जागतिक अर्थ परिषदेत विविध उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते. विशेषतः गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील याकडे शिंदे साहेबांचे वैयक्तिक लक्ष आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून सुमारे १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे.
राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. याचे श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ( CMEGP ) अंतर्गत विशेष प्रवर्ग/घटकांमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक या घटकांना आतापर्यंत लाभ देण्यात येत होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने यामध्ये आता आणखी तीन घटकांचा समावेश केला आहे. या तीन घटकांमध्ये इतर मागास प्रवर्ग/विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेमध्ये या नवीन घटकांचा समावेश झाल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी CMEGP योजनेचे लक्षांक पाचपटीने वाढविण्यात आले आहेत. यावर्षी ₹ ५५० कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा लाभ सुमारे २५००० घटकांना होणार आहे.
आज संपूर्ण राज्याला एकनाथजी शिंदे यांची ओळख ही विकासपुरूष म्हणून झालेली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे व्हिजन त्यांच्याकडे असून विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील प्रत्येक भागाच्या विकासाकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष आहे. आता डिसेंबर महिन्यात शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. माझ्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी समस्त रत्नागिरीकर जनतेला ८०० कोटींच्या कामांचे गिफ्ट दिले. या दौऱ्यामध्ये त्यांच्या शुभहस्ते सुमारे ८०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत कमी वेळेमध्ये पूर्ण होण्यामध्ये एकनाथजी शिंदे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. हा महामार्ग केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. हे साध्य करण्यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या महाकाय प्रकल्पातलं भूसंपादनाचं कठीण काम त्यांनी अवघ्या १८ महिन्यांच्या वेळेमध्ये पूर्ण केले. विशेषतः शेतकऱ्यांनी आनंदानं या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या.
एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून लोकहिताच्या कामांना प्राधान्यक्रम देत कामाचा धडाका लावलेला आहे.
यातील काही महत्वपूर्ण निर्णय :
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा निर्णय
- औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- महाराष्ट्रात 9 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा निर्णय. यानुसार नाशिक,जळगाव,सांगली,अकोला,हिंगोली,रत्नागिरी,रायगड,भिवंडी,पुणे येथे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येतील.
- ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय.
- भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयां तील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यास सुरू.
- रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
- आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जाणा-या लाखो वारक-यांना व गणेशोत्सवात कोकणात जाणा-या भाविकांना टोल मध्ये सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- गोविंदा पथकातील गोविंदाना १० लाख रुपयाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय
- विधानसभा सभागृहात हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय
- ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास
- राज्यातील पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात तीन रुपये प्रति लिटर कपात करण्याचा निर्णय करुन सर्वांना दिलासा देण्यात आला.
- राज्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतक-यांच्या पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना NDRI (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) मदतीच्या दुप्पट रक्कम देण्याचा आणि २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय
- मराठा आरक्षण कोर्टाने रद्द केल्यामुळे या पुर्वीच निवड झालेल्या हजारों पात्र निवड झालेल्या उमेदवारांना विशेष कायदा करुन नियुक्ती आदेश देण्यात आले.
- दहीहंडी, गणेशोत्सव नवरात्रौत्सव सर्व समाजांचे विविध सण उत्साह पुर्ण मोकळ्या वातावरणात साजरे करण्यास परवानगी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन युती सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी २४×७×३६५ दिवस अव्याहतपणे कार्यरत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे गेली चार दशकं झाली सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. शिवसेनेचा ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा विचार घेऊन ते जनसामान्यांसाठी कार्यरत आहेत. शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत इतर सर्व नेत्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांना वेळेचे, काळाचे असे काहीही बंधन नाही. कधी – कधी मला प्रश्न पडतो की ते झोपतात कधी? दिवसभर शासकीय कामकाज आणि मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या भेटी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम ते करीत असतात. सकाळी ३ – ४ वाजता त्यांनी बैठका घेतलेल्या मी पाहिल्या आहेत. ‘सर्वसामान्य नागरिकांचे भले झाले पाहिजे’ हा एकच विचार घेऊन ते सदैव कार्यशील असतात.
भारताला पाच ट्रिलिअनची अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी केला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्रावर मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ही जबाबदारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अत्यंत चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत.
आज लोकांमध्ये शिंदे – फडणवीस सरकार म्हणजे आपलं सरकार असल्याची भावना निर्माण झालेली आहे. शिंदे साहेब आपण लोकांचे मुख्यमंत्री आहात. आपल्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला आपण दिलीत याबद्दल आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपणास पुनःश्च एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा!
– उदय सामंत,
बाळासाहेबांची शिवसेना उपनेते,
उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री : रत्नागिरी व रायगड जिल्हा