लम्पीने घेतला आतापर्यंत 401 जनावरांचा बळी
रत्नागिरी : लम्पी या आजाराने आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 401 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागात झाली आहे. त्यापैकी 201 जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एकूण 19 लाख 84 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे 3 हजार गुरांपैकी 2 हजार गुरे लम्पीमुक्त’ झाली आहेत. जिल्ह्यात एकूण 2 लाख 35 हजार 50 इतके पशुपालकांकडे पशुधन आहे. पण लम्पी आजाराने 323 गावातील जनावरांना त्याचा फटका बसला. जिल्हयात लम्पी आजाराची बाधा येथील पशुपालकांच्या गुरांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यामध्ये प्रामुख्याने खेडमध्ये सर्वाधिक तर संगमेश्वरमध्ये त्या खालोखाल गुरांचा समावेश आहे. चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातही गुरांना लम्पीची लागण बर्यापैकी झाली. गुरांवरील या आजाराच्या विळखा कमी करण्यासाठी जि.प.पशुसंवर्धन विभागा मार्फत तातडीने प्रतिबंधात्मयक मोहीम हाती घेण्यात आली.
गेल्या चार महिन्यात 3 हजार गुरांना लागण होताच हा विळखा थांबण्यासाठी गावोगावी लसीकरण सुरू झाले. त्या मोहिमेत 2 लाख 27 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर 2 हजार गुरे लम्पीमुक्त झालेली आहेत.
दरम्यान, या आजाराने ग्रासलेल्या 400 बैल, 188 गायी, 56 वासरं यांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 401 गुरांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 201 मृत गुरांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव आतापर्यंत मंजूर करण्यात आले आहेत. काही प्रस्तावांमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. मंजूर प्रस्तावांतील 73 पशुपालकांना आतापर्यंत प्रशासनस्तरावरून 19 लाख 84 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.