
अंगणवाडी सेविकांचे दि. 20 फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन
रत्नागिरी : मानधन, अंगणवाड्यांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्ट्या बंद, नवीन मोबाइलसाठी आंदोलन करूनही दखल नाही, सदोष ट्रॅकर अॅप अशा समस्या वारंवार मांडूनही शासनाने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकांनी दि. 20 फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संंघटना बुधवारी जिल्हास्तरावर प्रातिनिधीक निदर्शेने करुन निवेदन देणार आहे.
सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र, अंगणवाडी सेविकांच्या साध्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मानधनामध्ये साडेपाच वर्षांपूर्वी तर केंद्र सरकारकडून साडेचार वर्षांपूर्वी मानधनामध्ये वाढ करण्यात आली. त्या नंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मानधनासह अन्य मागण्यांसाठी आता अंगणवाडी सेविकांनी अटीतटीची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिला आहे. दि. 20 फेब्रुवारीपासून अंगणवाड्यांचे कामकाज बंद ठेवण्यात येईल, असा निर्णय घेऊन आता रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आहे.