गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या महिलेला बुडताना वाचवले
रत्नागिरी : तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कोल्हापूर येथून आलेल्या महिलेला बुडताना वाचवण्यात तेथील जीवरक्षकांना यश आले. ही घटना सोमवार 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वा. घडली.
प्रियांका बालाजी सपाटे (३०, मंगळवारपेठ, ता. जि. कोल्हापूर) असे वाचवण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. सोमवारी दुपारी १ वाजता त्या समुद्राच्या पाण्यात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या गटांगळ्या खाऊ लागल्या. ही बाब जवळच असणाऱ्या त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा त्यांचा आवाज तेथील जीव रक्षकांनी ऐकला. पोलीस व मोरया वॉटर स्पोर्टच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून सायंकाळी सोडून देण्यात आले.