खासगी इंग्लिश मीडियम स्कुलकडे विद्यार्थी वळविण्याचा भाजपचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
रत्नागिरी : शासकीय शाळांचे बळ आणि दर्जा कमी करून खासगी इंग्लिश मीडियम स्कुलकडे विद्यार्थी वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिक्षण पद्धतच बदलण्याचे धोरण भाजपने अंगीकारले आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यास या शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध शिक्षकांच्या मनात प्रचंड राग आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच सर्वाधिक शिक्षण संस्था आहेत. सेना आमच्यासोबत असल्याने आमची ताकद वाढली असून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटील हे या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास या निवडणुकीचे प्रचारप्रमुख आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
येथील विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदेश मयेकर आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टी डी एफ, बहुजन शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत बाळाराम पाटील हे उमेदवार आहे. प्रत्येक शाळा, संस्था आमचे स्वागत करून बाळाराम पाटील यांना जाहिर पाठिंबा देत आहेत.