‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावर राष्ट्रीय परिषद
खेड : तालुक्यातील मोरवंडे – बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालय येथे ‘कोकण स्वयंपूर्णतेकडून स्वयंसिद्धतेकडे’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे माजी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भरत मोरे, सीतारामपंत जामकर, प्रा . ओंकार कुलकर्णी उपस्थित होते. या एकदिवसीय परिषदेमध्ये कोकणचा इतिहास, कोकणची संस्कृती, कोकणामध्ये असलेली आजची स्थिती व येणार्या काळात असलेल्या संधी तसेच पर्यटन विकास, जैवविविधता यावर विचार मंथन करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेसाठी देशभरातून अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित राहून सर्व प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेचे माजी सदस्य दत्ता नाईक, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन नाशिकचे सेक्रेटरी डॉ . दिलीप वेळगावकर, लोकमान्य टिळक वाचन मंदिरचे प्रकाश देशपांडे, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद देवधर, अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे प्रादेशिक समन्वयक डॉ . राधाकृष्ण जोशी याबरोबरच सुहासिनी देशपांडे, डॉ. शुभांगणा अत्रे, पद्मश्री जोशाळकर, नीता ओमप्रकश, धीरज वाटेकर, विकास मेहेंदळे, डॉ. अदिती अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेमध्ये कोकणचा इतिहास, संस्कृती कोकणातील समस्या व त्यावरील समाधान तसेच कोकणचा विकास, पर्यटन, जैवविविधता या विषयावर चर्चा करण्यात आली. या परिषदेला उपस्थित असणार्यांचे आभार डॉ. उमेशकुमार बागल यांनी
मानले.