
‘आंबा बागायतदारांची कर्ज माफ करा, हमीभाव दद्या’; रत्नागिरीत आंदोलन
रत्नागिरी : हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीने प्रजासत्ताक दिनी रत्नागिरीत धरणे आंदोलन छेडले. शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.आंबा बागायतदारांची कर्जे सरसकट माफ करावीत आणि आंब्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने, मंगेश साळवी, रमेश कीर, साक्षी रावणंग, प्रकाश साळवी, दीपक राऊत, संजय यादवराव, नंदू मोहिते, किरण तोडणकर यांच्यासह आंबा व्यावसायिक सहभागी झाले होते.
सन गेल्या 2015 सालापासून थकीत कर्ज असलेल्या शेतकर्यांची संख्या 11 हजार 326, तर थकीत रक्कम 223 कोटी 86 लाख रुपये आहे. या शेतकर्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा, नियमित असणार्या कर्जदारांना पुन्हा व्यवसायात उभे राहण्यासाठी मिनी पॅकेज जाहीर करावे, रत्नागिरी जिल्ह्यात कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करावी, पीकविम्याचा कोकणातील शेतकर्यांना लाभ मिळावा, त्यासाठी तलाठी सजाला एक डोंगराळ आणि दुसरे सपाटी भागास अशी दोन मोजणीयंत्रे बसवावीत, विम्याचे निकष बदलावेत, निकष ठरवताना शेतकर्यांच्या संस्थेचा प्रतिनिधी घ्यावा, अवकाळी पावसाचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 7 जूनपर्यंत असावा, खते, औषधे, पेट्रोल आणि रॉकेलच्या भरमसाट वाढलेल्या किमती तत्काळ कमी करण्यात याव्यात, शेतकर्याने खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे, थकीत शेतकर्यांवर जप्तीची सुरू असलेली कारवाई कर्जमाफी मिळेपर्यंत तत्काळ थांबवावी, शून्य वीजचोरी असलेल्या कोकणात पूर्वीप्रमाणे शेतकर्यांना योग्य कृषी वीजबिले द्यावीत, भरमसाट बिले पाठवणे बंद करावे,आंबा हे पीक नाशवंत असल्याने या पिकाला हमीभाव मिळावा, अशा मागण्यांचा समावेश होता.