वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम राज्यासाठी आदर्श पॅटर्न ठरेल : ना. उदय सामंत
चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम राज्यासाठी पॅटर्न ठरेल अशाप्रकारे नदी गाळमुक्त करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. 24) चिपळूण येथील बचाव समितीच्या बैठकीत दिले.
चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात ना. सामंत यांच्यासोबत मंगळवारी वाशिष्ठी व शिव नदी गाळमुक्त करण्यासह चिपळूण पूरमुक्त, लाल व निळी रेषा हटविण्याबाबत बचाव समितीसमवेत बैठक झाली. यावेळी ना. सामंत यांनी सांगितले की, सध्या आचारसंहिता असल्याने कोणताही निर्णय शासन जाहीर करणार नाही. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास स्पष्टपणे सूचित केले आहे की, चिपळुणातील वाशिष्ठी नदीचा गाळ कोणत्याही परिस्थितीत काढून शहर पूरमुक्त करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य, निधी, यंत्रसामुग्री उपलब्ध केली जाईल. मात्र, या संदर्भात आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दि .3 फेब्रुवारीनंतर योग्य कार्यवाही करण्यात येऊन वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम हे राज्यासाठी पॅटर्न ठरेल असेच काम करून घेतले जाणार आहे. केवळ वाशिष्ठी नदीच नाही तर राज्यातील महत्त्वाच्या नद्यांसह कोकणातील सावित्री नदीपासून सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या नद्यांतील गाळ काढण्याकरिता चिपळूणचा वाशिष्ठी पॅटर्नचा वापरला जाईल, असे ना. सामंत म्हणाले.