रत्नागिरीत एप्रिलमध्ये राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राच्या सहभागाने 12 वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन रत्नागिरी येथे दि. 15 एप्रिल ते 17 एप्रिल 2023 या दरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील खगोल अभ्यासक प्रथमच कोकणात एकत्र येत आहेत. खगोलाच्या विविध विषयातील व्याख्याने, निरीक्षणे प्रात्यक्षिके आणि आधुनिक माहिती सहभागींना मिळणार असल्याची माहिती राज्य खगोल मंडळाचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या कोकणाला अनेक विद्वान गणिती व खगोल अभ्यासकांची परंपरा लाभली आहे. खगोलशास्त्रावर आधारित पंचाग सुधारणेच्या शंभर वर्षांपूर्वीच्या चळवळीत मूळ कोकणातील असलेले विसाजी रघुनाथ लेले, ठाण्याचे केरोपंत छत्रे, लोकमान्य टिळक तसेच व्यंकटेश बापुजी केतकर आणि अलिकडील कृ. वि. सोमण आणि दा. कृ. सोमण ही नावे कोकणाशी संबधित आहेत. पाश्च्यात्य धर्तीवर आकाश निरीक्षणाचे ‘आकाशाचे देखावे’ हे पहिले मराठी पुस्तक तर रत्नागिरीच्या पहिल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक केळकर यांनी लिहिले आहे.
हौशी खगोल अभ्यासकांनी स्थापन केलेली राज्य खगोल अभ्यासक मंडळ ही प्रसिद्ध संस्था असून महाराष्ट्रात खगोल विज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने वार्षिक संमेलने विविध ठिकाणी आयोजित करीत असते. महाविद्यालयाचे खगोल अभ्यास केंद्र हे अशा खगोल विषयात काम करणार्या संस्थाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते राज्य खगोल अभ्यासकांच्या संमेलन आयोजनात सन 1998 नंतर जवळपास चोवीस वर्षाचा प्रदीर्घ मोठा खंड पडला होता परंतु औरंगाबाद येथे 11 वे संमेलन आयोजित करून पुन: या संमेलनांची सुरुवात झाली आहे.
विद्यमान वर्षी गोगटे -जोगळेकर महविद्यालयाच्या सहभागाने 12 वे राज्यस्तरिय खगोल अभ्यासकांचे संमेलन रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यासाठी राज्य खगोल मंडळाचे संस्थापक सदस्य जेष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण, ठाणे श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र 1 औरंगाबाद आणि सचिन मालेगावकर, हौशी खगोल मंडळ, नाशिक यांनी सोमवारी महविद्यालयास भेट दिली व राज्य खगोल अभ्यासक संमेलनाविषयी मार्गदर्शन केले.