जलजीवन मिशनसाठी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये होणार विशेष ग्रामसभा

0
32

रत्नागिरी : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावोगावी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशन संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये या सभा होणार आहेत. ‘हर घर जल से नल’  या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देण्याचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने ही सभा होणार आहे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या 5 महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार अहे. तसेच प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता निरीक्षक महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संचातून पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षिक आरोग्य सेवक व जलसुरक्षामार्फत करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संचच्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणार्‍या पाण्याच्या तपासणीबाबतच्या नियमित कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात येणार आहे. ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून विशेष स्थान देण्यात येऊन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे.
ग्रामसभेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची माहिती, योजनेचे उद्दिष्ट, रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची चकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शवणारे माहिती फलक योजनेच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here