चिरे भरून निघालेल्या डंपरखाली सापडून दीड वर्षाची बालिका ठार
संगमेश्वर : चिरे ओव्हरलोड भरून निघालेल्या डंपरखाली सापडून दीड वर्षाची बालिका ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे घडली. निश्चिता भरत चव्हाण (रा. सालोटगी, विजापूर.) असे बालिकेचे नाव आहे.
य बाबत चिरेखाण मालक मयूर शंकर ओकटे यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या चिमुकल्या बालिकेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे माखजन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घनेनंतर चिरेखणीवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मयूर शंकर ओकटे यांच्या मालकीच्या मौजे करजुवे येथील जमिनीमध्ये चिरेखाणीवर ह दुर्घटना घडली. चिरे वाहतुकीचे काम करणारा डंपर (एमएच 08, डब्लू 8595) गाडीवरील चालक मारुती हुन्नू चव्हाण (31, रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) हा चिरेखाणीवर चिरे भरुन निघाला असताना डंपरखाली सापडून निश्चिता भरत चव्हाण या बालिकेचा चिरडून मृत्यू झाला. या संदर्भात तपास संगमेश्वर पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.