
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात दि. 22 ते 28 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजला आहे.
उत्सव कालावधीत मंदिरासह मंदिर परिसरात 22 पासून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात देवस्थानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. 22 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 श्रींची महापूजा व प्रसाद, सायंकाळी 4 ते 7 गणेशयाग देवता स्थापना आदी कार्यक्रम झाले. दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गणेश याग पूर्णहुती, दि. 24 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहस्त्र मोदक समर्पण, दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा), दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाप्रसाद (रथसप्तमी), याचबरोबर रविवार दि. 22 ते गुरुवार दि. 26 जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत डोंबिवली येथील ह.भ.प. मोहक प्रदीप
रायकर यांचे श्राव्य कीर्तन होईल.
शुक्रवार दि. 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ‘स्वरार्पण’ ही शास्त्रीय, अभंग व नाट्यसंगीताची मेजवानी असलेली मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीधर पाटणकर व करुणा पटवर्धन यांचे सादरीकरण होणार आहे.
याचबरोबर मंदिर परिसरात दि. 28 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता ‘हसवा- फसवी’ हे विनोदी नाटक श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळ गणपतीपुळे यांच्यामार्फत सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गजानन जोशी, शिवानी जोशी, श्रीधर घनवटकर, शौनक जोशी, अभिजित घनवटकर यांनी भूमिका साकारली आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिरात आठवडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन गणपतीपुळे देवस्थानकडून करण्यात आले आहे.