
लोटेतील सीईटीपी गुरुवारी सायंकाळपासून पुन्हा सुरू
खेड : लोटे येथील सीईटीपी गाळाने भरल्यामुळे ठप्प झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात सीईटीपीची यंत्रणा सुरू होती. काहीअंशी गाळाचा परिणाम झाला असला तरी गुरुवारी सायंकाळपासून सीईटीपी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. उद्योजकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. सीईटीपीचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघ, संचालक आर. सी. कुलकर्णी व सर्व उद्योजकांनी मिळून यशस्वीपणे सीईटीपी कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केल्याने मार्ग निघाला आहे.
गेले दोन दिवस लोटे येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गाळाने भरल्यामुळे ठप्प झाल्याचे सांगण्यात येत होते. येथील उद्योजक संघटनेचे अध्यक्ष व आवाशीचे सरपंच अॅड. राज आंब्रे यांनी या संदर्भात सीईटीपी व एमआयडीसीकडे तक्रार केल्यानंतर या प्रकल्पाची यंत्रणा बंद करण्यात आली होती. आंब्रे यांनी, सीईटीपी गाळाने भरला आहे.
तो बंद करून आधी पाहणी करावी, अशी मागणी एमआयडीसीकडे केली होती. त्यामुळे एमआयडीसीने हा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना संबंधित संचालकांना दिल्या होत्या. त्यानुसार काही दिवस सीईटीपीतील डिस्चार्ज कमी करण्यात आला होता. मात्र, सीईटीपी पूर्णपणे बंद केलेला नव्हता. याचा काहीअंशी परिणाम लहान उद्योजकांवर झाला असला तरी मोठ्या उद्योगांवर झाला नव्हता.
या संदर्भात उद्योजकांच्या सातत्याने बैठका झाल्या. तसेच सीईटीपीच्या संचालकांनी तत्काळ विचारविनिमय करून प्रकल्पाचे डिस्चार्ज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आर. सी. कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. हा प्रकल्प गुरूवारी सायंकाळपासून चालविला गेला. यामुळे उद्योजकांची भीती कमी झाली आहे. बंदमुळे 75 उद्योग बंद पडणार अशी चर्चा रंगविण्यात आली होती. मात्र, ती आता फोल ठरली असून ही यंत्रणा सुरू होणार आहे.